पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांच्या “क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी’ रॅंकिंगमध्ये 541-550 या क्रमवारीच्या गटात स्थान प्राप्त केले आहे. गेल्यावर्षी पुणे विद्यापीठ हे 591-600 या क्रमवारीत होते. आता पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा 50 क्रमांकांनी वाढला आहे.
क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग ही जागतिक उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित रॅंकिंग प्रणाली आहे. गेल्या काही वर्षांत पुणे विद्यापीठाने या क्रमवारीत सातत्याने वरच्या क्रमवारीत स्थान पटकावले आहे. या वर्षीची क्रमवारी नुकतीच जाहीर झाली. यात जगभरातील 1 हजार 422 संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले असून भारतातील 41 आयआयटी आणि आयआयएससीसारख्या संस्थांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे टाइम्स हायर एज्युकेशन एशिया रॅंकिंगने यावर्षी डेटापॉईंट संशोधन श्रेणीमध्ये विद्यापीठाला विशेष पुरस्कार जाहीर केला. त्यासाठी 800 आशियाई शैक्षणिक संस्थांते मूल्यांकन करण्यात आले. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, माजी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्राध्यापकांच्या सहाय्याने गेल्या पाच वर्षांत विद्यापीठात केलेल्या चांगल्या कामांमुळे पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.
गेल्या काही वर्षांत पुणे विद्यापीठाने शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी सातत्याने प्रगती केली आहे. त्यामुळे देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक म्हणून मानाचे स्थान मिळवले आहे. रॅंकिंगमधील या प्रगतीमुळे इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्ससाठी दावा आणखी मजबूत झाला आहे.
– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
पुणे विद्यापीठाची रॅंकिंग 50 क्रमांकांनी सुधारल्याचा आनंद आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अनेक संकल्पना स्वीकारत आहोत आणि त्यांची पुनर्बांधणी करत आहोत. बहुविद्याशाखीय कार्यक्रम आणि संशोधनाच्या अंमलबजावणीमुळे आणखी उंची गाठण्यास नक्कीच मदत होणार आहे. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पुणे विद्यापीठातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
– डॉ. कारभारी काळे, प्रभारी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ