नगर – कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दोन उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांकडून फारसे काम प्रगतीपथावर झालेले नाही. त्यामुळे या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेत जिल्हा रुग्णालयाने गती घेऊन उद्दिष्ट पूर्ती 100 टक्के करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सभेमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. या सभेस सदस्य सोमनाथ पाचारणे, रामभाऊ साळवे, सविता अडसुरे, सचिव डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते. विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत झालेल्या लसीकरणाचा आढावा यामध्ये घेण्यात यामध्ये 97 टक्के बालके व 100 टक्के गरोधर मातांचे लसीकरण झाले असल्याचे सांगण्यात आले.
कायाकल्प कार्यक्रमांतर्गत 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सभेमध्ये अभिनंदन करण्यात आले. प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताह दोन ते नऊ नोव्हेंबर मध्ये 2272 नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती आरोग्यधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सभागृहात दिली.