1800 हेक्‍टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली आणण्याचा हेतू – शिवतारे

शिक्रापूर – पाबळ (ता. शिरूर) व परिसरातील गावांना कळमोडीचे पाणी मिळावे यासाठी येथील नागरिकांनी सुरू ठेवलेला पाठपुरावा आजही सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत कळमोडी, थिटेवाडी पाणी प्रकल्प योजनेसाठी वाचणाऱ्या 30 टक्के पाण्यात 1800 हेक्‍टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली आणण्याचा हेतू या योजनेचा असल्याचे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आजच्या बैठकीत केले.

बंद पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यावर सरकारचे एकमत झाल्यानेच 40 लाख रूपयांचे सर्व्हे काम दि. 16 जूनपासून सुरू केले आहे. त्यामुळे ही योजना लांबत असली तरी खास केंदूर ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्या पुढाकाराने मंत्री शिवतारे यांच्या दालनात नुकतीच बैठक पार पडली. खात्याचे प्रमुख अधिकारी, आमदार निरंजन डावखरे, सुरेश गोरे, शरद सोनवणे यांनी चर्चत सहभाग घेतला.

शिवतारे म्हणाले, ही योजना शेतकऱ्यांना व सरकारलाही कमी खर्चिक होईल, अशी बनवत असून लोकसभेच्या आचारसंहितेत सर्व्हे निविदा लांबली असली तरी पावसाळा संपताच सर्व्हे काम पूर्ण होऊन पुढील कार्यवाहीसाठी ही योजना तयार राहिल अन्‌ केवळ निर्णय प्रक्रीया व प्रत्यक्ष काम बाकी राहिल. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने गोविंद साकोरे, युवराज साकोरे, भरत साकोरे, सूर्यकांत थिटे, भाऊसाहेब थिटे व अशोक पऱ्हाड यांनी विविध प्रश्‍न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला. या योजनेमुळे खेड, आंबेगाव व शिरूरच्या दुष्काळी 12 गावांतील शेतकऱ्यांची पाणी समस्या दूर होणार असल्याने योजनेची कार्यवाही तातडीने करण्याची मागणी केली. केंदूरच्या काही भागासाठी प्रस्तावित कानिफनाथ उपसा सिंचन योजनेची माहिती घेऊन त्यावरची कार्यवाही सुचवावी असा शेरा शिवतारे यांनी दिला आणि तसे जावक क्रमांकासह पत्र मुख्य अभियंत्यांकडे सादर करण्याची सूचना शेतकऱ्यांना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.