मोहाली – आयपीएलच्या पुढील वर्षीच्या मोसमासाठी पंजाब किंग्ज संघाने मोठे फेरबदल केले आहेत. मुख्य प्रशिक्षक पदावरून अनिल कुंबळे यांची उचलबांगडी केल्यावर त्यांनी आता कर्णधारही बदलला आहे. मयंक आग्रवालच्या जागी पुढील वर्षी पंजाबचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे.
पंजाब किंग्ज संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्या स्पर्धेत मयंकच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पंजाबच्या संघाला अपयशाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी कुंबळे यांना डच्चू दिला होता. आता कर्णधारही बदलला असून मयंकसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आयपीएलमध्ये धवन सातत्याने सरस कामगिरी करत आहे, तसेच धवनला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय तसेच टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
कुंबळे यांच्या जागी ट्रेव्हर बेलिस यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेलिस यांच्या प्रशिक्षकपदाच्या कालावधीत इंग्लंडने 2019 सालची एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा जिंकली आहे. बेलिस हे 2012 व 2014 साली कोलकाता नाइट रायडर्सचेही प्रशिक्षक होते. आता बेलिस यांच्यासह ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू व यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिनही पंजाबच्या सपोर्ट स्टाफचा भाग बनला आहे.
पंजाब संघ मालकांना बेलिस व धवनकडून 2023 सालच्या आयपीएल स्पर्धेत मोठ्या अपेक्षा आहेत. 2014 साली पंजाबचा संघ या स्पर्धेच्या प्ले ऑफ गटात पात्र ठरला होता. त्यानंतर मात्र, यंदाच्या मोसमापर्यंत त्यांना सरस कामगिरी करता आलेली नाही.