न्यूयॉर्क – अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या मानवी हक्कांच्या पायमल्लीसंदर्भात न्यूयॉर्कमधील ह्युमन राईटस वॉच या आंतरराष्ट्रीय संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अफगाण तालिबानने हकिकी आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांना अटक केली आहे. त्यांचा एक व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये हे तिघेही जखमी अवस्थेत असून वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देणे आणि कुराणातील वचनांची निंदा करण्याबद्दल माफी मागताना दिसत आहेत.
28 मे रोजी या चौघांनी कुराणातील वचने विनोदी पद्धतीने सादर करण्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर आठवड्याभराच्या आत या चौघांना तालिबानच्या गुप्तचर विभागाच्या महासंचालनालयाने ताब्यात घेतले.
या चौघांकडून लेखी माफीनामा घेण्यात आला आहे. ते अजूनही तालिबानच्या कोठडीमध्ये आहेत. त्यांच्यावर अद्याप कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नाही. त्यांचे वकील किंवा कुटुंबियदेखील त्यांना भेटू शकलेले नाहीत. अशाप्रकारे अनेक जणांवर तालिबानने कारवाई केल्याचे ह्युमन राईटस वॉचचे आशिया विभागातील संशोधक फेरेश्ता अब्बासी यांनी सांगितले.
24 मे रोजी तालिबानने रेडीओ सेदाय आफ्ताबचे संचालक मिर्झा हस्सानी यांना एका विरोधकांच्या गटाला पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले होते. 10 मे रोजी एका टिव्ही पत्रकाराला कोणतेही स्पष्टिकरण न देता ताब्यात घेण्यात आले. जून महिना निम्मा झाला तरी या दोघांपैकी कोणाचीही सुटका झाली नाही.
एप्रिलमध्ये कंदहारमधील पत्रकाराला संगीताचा कार्यक्रम सुरू केल्याबद्दल ताब्यात घेतले गेले होते. त्याच्यावर विदेशींबरोबर काम केल्याचा आरोप ठेवला गेला होता. अफगाणिस्तानमधील स्वातंत्र्य आता मरण पावले आहे, असे हेरात प्रांतातील माध्यमकर्मींनी म्हटले आहे. पत्रकार, सोशल मीडिया कार्यकर्ते, आणि अन्य प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना तालिबानच्या कठोर नियंत्रणांचा सामना करावा लागतो आहे.