पुणे: हैद्राबाद मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणाने देशभर खळबळ उडाली आहे. एका महिला पशुवैद्यावर बलात्कार करून, तिला जाळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेप्रति सोशल मीडियावर लोकांचा रोष उमटत आहे. परंतु अशा घाटांबद्दल सोशल मिडीआयद्वारे व्यक्त होताना काळजी घेणे आवश्यक आहे. जर पीडितेची ओळख पटेल असा काही मजकूर प्रकाशित केला तर दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
हैद्राबाद मध्ये घडलेल्या घटनेबद्दल सोशल मिडियाद्वारे कलाकार, खेळाडू, राजकारणी अशा अनेकांनी लोकांककडून निषेध व्यक्त करण्यात आला. परंतु लोक आपल्या भावना व्यक्त करताना पीडितेचे व्हायरल फोटो शेअर करत आहेत. तसेच ट्विटरवर तिच्या नावाचे हॅशटॅगही पोस्ट केले गेले आहेत.
लैंगिक छळ किंवा बलात्काराच्या घटनांमधील कोणत्याही व्यक्तीची भारतीय दंड संहितेच्या कलम 228 अन्वये ओळख उघड करता येणार नाही असा कायदा असून, पीडितेचे नाव मुद्रित किंवा प्रकाशित करणारी एखादी व्यक्ती किंवा संस्थेला दोन वर्ष तुरूंगवासाची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात येऊ शकतो. अशी तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे.
ओळख जाहीर केल्यास संघर्ष अजून वाढतो. त्याचबरोबर पीडितेच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केले जाते. तसेच पीडिताला मानसिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते. अज्ञात बलात्कारी पीडिताच्या ओळखीचा फायदा घेऊ शकतो. पूर्वग्रहदूषित पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि वकील गैरवर्तन करू शकतात. त्यामुळे पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्याची सर्वानी काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत कायदातज्ञांनी व्यक्त केले आहे.