पुणे पालिकेच्या निविदा आता महाटेंडर पोर्टलवर

प्रशासनाचा निर्णय : पारदर्शक निविदा प्रक्रियेवर देणार भर

पुणे – माध्यमातून शहरातील विकासकामे तसेच साहित्य खरेदीसाठी राबविल्या जाणाऱ्या निविदा प्रक्रिया आता राज्य शासनाच्या महाटेंडर पोर्टलवर राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात निकोप स्पर्धा आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे.

महापालिकेच्या निविदा प्रक्रियेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून एका खासगी कंपनीद्वारे पालिकेकडून ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबविली जाते. या कंपनीस महापालिकेकडून आवश्‍यक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून कंपनीस प्रत्येक निविदेमध्ये सहभागी होणाऱ्या ठेकेदारांकडून प्रत्येकी 200 रुपयांचे शुल्क दिले जाते. दरवर्षी पालिकेच्या हजारो निविदा असतात, त्यामुळे या कंपनीसही मोठा आर्थिक फायदा होत असला, तरी ही रक्कम ठेकेदार महापालिकेच्या विकासकामाच्या खर्चातूनच वसूल करते. त्यामुळे त्याचा भार अनावश्‍यकपणे महापालिकेवर येत असे. तसेच अनेकदा ही ऑनलाइन निविदा प्रक्रिया मर्यादित असल्याने काही ठराविक कंपन्या तसेच ठेकेदारच त्यात सहभागी होत असत, त्यामुळे अनेक निविदांसाठी स्पर्धाच होत नसल्याचे चित्र होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने राज्य शासनाच्या महाटेंडर पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपोआपच प्रत्येक कामासाठी देशपातळीवर निविदा प्रसिद्ध होऊन जास्तीत जास्त ठेकेदार त्यात कामासाठी सहभागी होऊन निकोप स्पर्धा तसेच निविदा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यास आणखी मदत होणार आहे.

जुन्या कंपनीस 3 महिन्यांची मुदत
ज्या कंपनीच्या माध्यमातून सध्या महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे, त्या कंपनीस तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यांच्याकडे काही निविदा प्रसिद्धीस दिलेल्या असून काही निविदांची अद्याप मुदत संपलेली नाही. त्यामुळे हे काम सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. त्यामुळे त्या निविदा वगळता या पुढील सर्व निविदा महापोर्टलवरच असणार आहेत.

निविदा प्रक्रियेत निकोप स्पर्धा व्हावी, तसेच पारदर्शकता वाढावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत आवश्‍यक असलेले प्रशिक्षण तसेच संगणक यंत्रणा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली असून या पुढील सर्व निविदा महाटेंडर पोर्टलद्वारेच राबविण्यात येणार आहे.
– रूबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)