नवी दिल्ली : तृणमूल कॉंग्रेसच्या फायरब्रँड खासदार महुआ मोईत्रा यांनी मंगळवारी अर्थसंकल्पावरून केंद्र सरकार आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. देशातील जनतेला सुधारणा अपेक्षित होत्या. मात्र, नेमके त्याउलट करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळ तेच ठेवण्यात आले. अर्थमंत्रीही त्याच राहिल्या. त्यांनी बदल नसलेला प्रभावहीन अर्थसंकल्प सादर केला, असे त्या लोकसभेत बोलताना म्हणाल्या.
अक्षरश: काहीच न करून अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पातून जनतेची चेष्टा केली. जे काही थोडे बदल करण्यात आले; ते मागे नेणारे आहेत, असे म्हणत महुआ यांनी अर्थसंकल्पाच्या हेतूविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अर्थसंकल्पाचा मध्यमवर्गावर आणि गरिबांवर प्रतिकूल परिणाम होणार असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्थसंकल्प नेमका कुणासाठी आहे? देशातील लोकसंख्येत मध्यमवर्गाचे प्रमाण ३१ टक्के, तर गरिबांचे प्रमाण ६० ते ६५ टक्के आहे. त्या दोन्ही घटकांची अर्थसंकल्पातून गळचेपी करण्यात आली आहे.
देशाच्या इतिहासात प्रथमच पगारदारांना श्रीमंत उद्योजकांपेक्षा अधिक करभार उचलावा लागणार आहे. करांमध्ये मध्यमवर्गाचा वाटा ५५ टक्के, तर उद्योजकांचा ४५ टक्के राहील. मध्यमवर्गाच्या उत्पन्नावरच नव्हे; तर बचतीवरही कर लावण्यात आला आहे, अशी शाब्दिक टोलेबाजी त्यांनी केली. अर्थसंकल्पात संरक्षणविषयक तरतुदींमध्ये काहीशी कपात करण्यात आल्यावरून महुआ यांनी सरकारला लक्ष्य केले. स्वत:ला वाचवण्यावर फोकस असल्याने सरकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करत असल्याचा आरोप त्यांनी केला.