जनतेने आता परिवर्तनाचा कौल दिला

अवसरी बुद्रुक येथील प्रचारसभेत डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन

मंचर – शाश्‍वत विकासाचा आदर्श म्हणजे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे आहेत. त्यामुळेच माझ्या सारख्या नवीन उमेदवाराच्या सभेला अभूतपूर्व गर्दी आणि प्रतिसाद मिळत आहे. पण ज्यांनी 15 वर्षे लोकप्रतिनिधित्व केले, त्यांच्याकडे ठोस कुठलीही कामे नाहीत, पेव्हर ब्लॉक, कचरा घंटागाडी ही कामे ते दाखवत आहेत. मात्र, खासदाराची ही कामे नसतात. त्यामुळे आता भांबावून गेलेल्या या खासदारांवर सभेला गर्दी होत नसल्याने रोजंदारीवर माणसे आणण्याची वेळ आली आहे. शिवाय मला घेरण्यासाठी आठ-आठ मंत्र्यांच्या सभा लावत आहेत. पण त्याने काही फरक पडणार नाही. कारण जनतेने आता परिवर्तनाचा कौल दिला आहे, असे प्रतिपादन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ अवसरी बुद्रुक गावठाण येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उमेदवार डॉ. कोल्हे बोलत होते. याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, मंगलदास बांदल, विष्णू हिंगे, पूर्वा वळसे पाटील, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, मानसिंग पाचुंदकर, विलास भुजबळ, भागोजी कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले की, सर्वसामान्य माणसाने निवडणूक लढवायची नाही का? मतदार म्हणून काय कामे केली याचा जाब विचारण्याचा अधिकार नाही का? ज्यांनी मते दिली. त्यांच्या विश्‍वासाला चुनावी जुमले अशा शब्दात अवहेलना करून तडा देण्याचे काम करणाऱ्या मोदी सरकारसाठी हे खासदार मते मागत आहेत. पण त्यांनी मतदारसंघासाठी काय केले हे आधी सांगावे. गल्लीत एक बोलायचे अन्‌ दिल्लीत मूग गिळून बसायचे असा कारभार या खासदारांचा आहे, असा टोलाही डॉ. कोल्हे यांनी लगावला.

या परिसराचा विकास हा दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे झालेला आहे. असे असताना येथे हे खासदार येतात आणि कोट्यवधी रुपयांची कामे केल्याचे सांगतात आता काय बोलायचे? यंदा परिवर्तन अटळ आहे आणि डॉ. कोल्हे संसदेत पोहोचणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

-विष्णू हिंगे, अध्यक्ष, जिल्हा दूध संघ, पुणे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.