जनता जाब विचारतेय; उत्तर हवंय

डॉ. अमोल कोल्हे ः लोकहिताला माझे सदैव प्राधान्य

कात्रज – कात्रज येथे विद्यमान खासदारांबाबत “आपण यांना पाहिलंत का?’ हा फलक पाहिला आणि याची खंत वाटली. नागरिकांवर ही वेळ का ओढवते? याचा विचार मनापासून करण्याची गरज आहे. मुळात लोकहितासाठी दूरदृष्टी ठेवून प्राधान्यक्रम देऊन काम केल्यास जनता लोकप्रतिनिधीच्या मागे उभी राहते. जनता जाब विचारते, कारण तो जनतेचा अधिकार आहे. आता विद्यमान खासदारांनी जनतेच्या प्रश्‍नांची उत्तरे दिलीच पाहिजेत. या तुमच्या मताशी मी सहमत आहे. मी शब्द देतो की, परिवर्तनाच्या लाटेत तुमचा आवाज माझ्या रुपाने संसदेत असेल आणि हडपसर मतदार संघातील नागरिकांसाठी स्वतंत्र जनसंपर्क कार्यालय राहील, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कात्रज वासियांनी आपण यांना पाहिलंत का? या आशयाचा फलक कात्रज तलावाजवळ लावून विद्यमान खासदार यांच्याकडे कामांचा हिशेब मागितला आहे. शिवाय आमची 50 ते 60 हजार मते तुम्हाला नको काय? असा सवालही केला आहे. विशेष म्हणजे या फलकावरील नागरिकांच्या आक्षेपाला अजूनही उत्तर मिळाले नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांनी केला.

दरम्यान शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्टवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी कात्रज परिसराला भेट दिली. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी ठिकठिकाणी उभारलेल्या ‘आपण यांना पाहिलंत का?’ या विद्यमान खासदारांना विचारलेल्या जाबवजा फलकाकडे डॉ. अमोल कोल्हे यांचे लक्ष वेधून दिले. प्रारंभी कात्रज गावात डॉ. अमोल कोल्हे यांची बैलगाडीतून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर काळभैरवनाथ मंदिरात महाआरती करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह राष्ट्रवादीचे स्थानिक नेते नमेशशेठ बाबर, नगरसेविका अमृता अजित बाबर, माजी नगरसेवक सुरेश कदम, नगरसेवक प्रकाश कदम, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेवक संतोष फरांदे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय लिहिलेय फलकावर?

स्थानिक नागरिकांनी विद्यमान खासदारांना जाहीररित्या फलक लावून कात्रजमध्ये दहा वर्षे का आला नाहीत? नागरिकांच्या गरजांची कधी चौकशी केली का? ज्या कात्रज मध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी विविध क्षेत्रातील लोक राहत असतानाही आपण कधी कार्यक्रमात सहभागी झाला का? लग्नसमारंभात कधी सहभागी झाला का? अंत्यविधीमध्ये सांत्वनासाठी आला का? तुम्हाला येथील 50 हजार मतदारांची गरज नाही का? खासदार म्हणून लोक प्रतिनिधित्व करताना जबाबदारी आठवली नाही का? आदी प्रश्‍न विचारले आहेत. हा फलक सध्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.