इस्लामाबाद – पाकिस्तानमधील करोनाबाधितांची संख्या शनिवारी 1 हजार 415 इतकी झाली. त्या देशातील करोनाचे केंद्रस्थान आता पंजाब प्रांत बनला आहे. पाकिस्तानात आतापर्यंत करोनाने 12 बळी घेतले आहेत.
पाकिस्तानातील पहिल्या करोनाबाधिताची नोंद काही दिवसांपूर्वी सिंध प्रांतात झाली. त्यानंतर त्या प्रांतातील बाधितांचे प्रमाण वाढत गेले. मात्र, बाधितांच्या संख्येत आता पंजाब प्रांताने सिंधला मागे टाकले आहे.
पंजाब प्रांतात 490 तर सिंधमध्ये 457 बाधित आढळले आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीला चीन धावला आहे. चीनमधील डॉक्टरांचे एक पथक पाकिस्तानला भेट देणार आहे. ते पथक पाकिस्तानमधील उपचारांची माहिती घेऊन स्थानिक डॉक्टरांना सल्ला देणार आहे.
पाकिस्तानातील बहुतांश करोनाबाधित इराण भेटीवरून परतल्याचे निष्पन्न झाले आहे. इराणमध्ये करोनाने मोठा कहर केला आहे. त्या देशातील 35 हजारहून अधिक नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. त्यातील 2 हजार 500 हून अधिक रूग्ण आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत. करोना बळींच्या संख्येचा विचार करता इराण जगात चौथ्या स्थानावर आहे.