मुठा कालव्याची संरक्षण भिंत पडली

अपघाताचा धोका वाढला : भिंतीची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

वानवडी – मुठा कालव्या शेजारून बी.टी.कवडे रोड ते रेसकोर्सकडे जाण्यासाठी डांबरीकरण केलेला रस्ता आहे. या रस्त्याचा काही भाग हा कालव्यामध्ये ढासळला आहे. या कालव्या लगतच्या भिंतही पडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून पडलेल्या संरक्षण भिंतीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. पण प्रशासन याची कधी दखल घेणार? हा खरा यक्षप्रश्‍न आहे. मुठा कालवा हा रेसकोर्स ते बी.टी.कवडे रोड पुलगेट महात्मा गांधी बसस्थानक, रेसकोर्स बी.टी. कवडे रोड, सेंट पॅट्रीक, शिंदे वस्ती, चिमटा वस्ती, घोरपडी गावा शेजारून पुढे हा कालवा महादेवनगर हडपसरकडे वाहत जात आहे. बी. टी. कवडे रोड वरून रेसकोर्सकडे जाण्यासाठी दुचाकी वाहने जातील असा डांबरी रस्ता आहे.

हा रस्ता सुमारे 3 किलोमीटर कालव्याच्या बाजूने आहे. या कालव्या लगत संरक्षण भिंत पडली असल्याने यामुळे कालव्याचे पात्र चटकन लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. येरवडा लष्कर भागात जाण्यासाठी हा रस्ता जवळचा असल्याने या रस्त्याचा वाहनचालक वापर करतात. या रस्त्याचा काही भाग कालव्याच्या बाजूस खचला आहे. काही ठिकाणच्या भिंतही पडलेली आहे. त्यातच खडकवासला धरणात पाण्याचा साठा कमी असल्याने या कालव्यात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने कालवा कोरडा पडला आहे. त्यात साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील जनता वसाहत येथील कालवा फुटून परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासन वेळोवेळी दखल घेत नसल्याने याचा त्रास नेहमी नागरिकांना होत आहे. कालव्या लगत सरंक्षण भिंत व जाळ्या नसल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना व वाहनचालकांना कालव्याच्या पात्राचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कालव्या लगत सरंक्षण भिंत बांधण्यात यावी व सरंक्षण जाळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी गेली अनेक वर्षांपासून येथील स्थानिक नागरिक करत आहेत. त्याचेही काम पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर करावे, अशी कालव्यालगत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

वानवडी वाहतूक विभागाकडून कालव्या लगतच्या भिंती पडल्या असल्याचे संबंधित खात्याशी पत्रव्यवहार करून कळवले आहे. पडलेल्या भिंतींची त्वरित दुरूस्ती करणे गरेजेचे आहे.

-राजेंद्र विभांडीक, वाहतूक पोलिस निरीक्षक

बी. टी. कवडे रोड ते रेसकोर्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास पथदिवे कमी प्रमाणात असल्याने रस्त्यावर प्रकाश व्यवस्था कमी प्रमाणात असल्याने या कालव्याचे पात्र दिसून येत नाही. प्रशासनाने त्वरित पथदिव्यांची संख्या वाढविली पाहिजे. जेणेकरून मुठा कालव्याचे पात्र वाहनचालकांच्या दृष्टीस पडेल.

– देविदास लोणकर, वाहनचालक 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.