रिपब्लिकन ऐक्‍याची शक्‍यता धूसर

रामदास आठवले यांचे सूचक भाष्य : आजही तरुणवर्ग आशादायी

पिंपरी – राज्यातील सर्वात शक्‍तीशाली चळवळ असलेल्या दलित चळवळीला पोषक असलेले रिपब्लिकन ऐक्‍य होण्याची शक्‍यता धूसर होत चालली आहे. या ऐक्‍यासाठी आग्रही भूमिका घेणारे केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यादरम्यान सूचक भाष्य करत रिपब्लिकन ऐक्‍य ही संकल्पना आता संपुष्टात आल्याकडे इशारा केला. आठवले म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांना ते मान्य नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या धर्तीवर आम्हीदेखील सर्व जाती-धर्मांना रिपब्लिकन पक्षात सामावून घेत, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष घडवत आहोत.’

आरक्षणविरोधी वक्‍तव्य असो किंवा राज्यातील कोणत्याही जाती धर्मावरील नागरिकावर झालेला अन्याय असो प्रत्येक वेळी दलित कार्यकर्ते तत्काळ रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र आहे. मात्र, रिपब्लिकनचा ऐक्‍याचे दोन प्रयत्न फसले.

त्यानंतर 1996 साली झालेल्या ऐक्‍यातून समाजाला प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, रा. सु. गवई आणि प्रा. जोगेंद्र कवाडे लोकसभेवर निवडून गेल्याचे सुखद चित्र पहायला मिळाले होते. आता राज्यात कुठेही दलित अत्याचाराची घटना घडली, तर रिपब्लिकन ऐक्‍याबरोबरच दलित पॅंथरच्या पुनरुज्जीवनाचा नारा दिला जात आहे. राज्यातील दलित तरुण आजही आशादायी आहे. सर्व नेत्यांनी एकत्र बसून, चर्चेतून हा प्रश्‍न सोडवावा, अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. मात्र, आता हे ऐक्‍य पहिल्या फळीतील नेत्यांकडून शक्‍य नसल्याचे चित्र आहे.

एक तर रिपब्लिकनच्या नेत्यांचे उतारवय आहे. पहिल्यासारखा आक्रमकपणा राहिलेला नाही. त्यातच भीमा कोरेगावच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थकांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाची भारतीय जनता पक्षासोबत युती आहे. सध्या रिपब्लिकन पक्षाचा एकही आमदार विधिमंडळात नाही. रिपाइंचे एकमेव राज्यसभा सदस्य आहेत रामदास आठवले या व्यतिरिक्त विधिमंडळातील दोन्ही सभागृहात त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य नाही. तर प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी कॉंग्रेसशी घरोबा करत विधानपरिषद सदस्यत्व मिळविले आहे. तर रा.सु. गवई यांच्या निधनाने त्यांचे वारसदार फारसे प्रभावी ठरू शकले नाहीत. चार नेत्यांमध्ये रिपब्लिकनच्या ऐक्‍याचा पेटारा बंद झाल्याचे चित्र आहे.

रिपाइं दुभंगलेल्या अवस्थेत
प्रकाश आंबेडकरांनी आपले लक्ष विदर्भावर केंद्रित करत, अकोला जिल्हा परिषद ताब्यात ठेवत नुकत्याच पार पडलेल्या व ग्रामपंचायत निवडणुकीत याठिकाणी आपला चांगला प्रभाव दाखविला आहे. त्यांच्यासोबत वंचितमध्ये राहिलेले गोपीचंद पडळकर, यशपाल भिंगे यांनी अनुक्रमे भाजप व राष्ट्रवादीने उचलून घेत, त्यांना आमदारकी बहाल करत वंचितला धक्का दिला. तर सध्या आरपीआयचे वेगवेगळे गट कार्यरत आहेत. प्रत्येकजण आपआपल्या परीने ताकद दाखविण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये प्रभावशील गट हा आठवले यांचा आहे. ते सध्या भाजपसोबत आहेत. अन्य गटांची दोन्ही कॉंग्रेसशी मैत्री आहे. त्यामुळे दुभंगलेल्या अवस्थेत आरपीआय आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.