सचिव, अधिकाऱ्यांमुळेच जिल्हा बॅंकेची प्रगती

बॅंक कर्मचारी कार्यशाळेत उदयनराजे भोसले यांचे गौरवोद्‌गार

सातारा – शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी मानून काम करणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने 1000 कोटी रुपयांचा नफा मिळवला. या यशात सोसायट्यांचे सचिव व बॅंक अधिकारी-सेवकांचा सिंहाचा वाटा आहे, असे गौरवोद्‌गार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी काढले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सचिव व बॅंक कर्मचाऱ्यांची कार्यशाळा झाली. व्यवसाय वृद्धी नियोजन व विकास सेवा संस्था सक्षमीकरण हा कार्यशाळेचा विषय होता. जिल्हा बॅंकेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी उदयनराजे बॅंकेत गेले होते. त्यावेळी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी उदयनराजेंनी कार्यशाळेस धावती सदिच्छा भेट दिली. आमदार शशिकांत शिंदे, बॅंकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, प्रकाश बडेकर, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, सुजीत शेख आदी उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, बॅंकेत कोणतही राजकारण येऊ दिलं जात नाही. शेतकऱ्यांचा विकास हाच केंद्रबिंदू मानून बॅंकेची आजपर्यंतची वाटचाल राहिली आहे. देशावर आर्थिक संकट मोठे आहे. उद्योग-व्यवसायांसह बॅंकींग क्षेत्रातही जिवघेणी स्पर्धा आहे. अशा स्थितीत सातारा जिल्हा बॅंक नफ्यात आहे. कर्मचारी व सचिवांचे योगदान यात मोलाचे आहे. या यशाचे श्रेय त्यांना योग्य पद्धतीने मिळाले पाहिजे.

शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही देशातील सर्व पुरस्कार मिळवणारी बॅंक आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, किसन वीर, लक्ष्मणतात्या, अभयसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून बॅंक उभी राहिली. शेतकरी व कर्मचारी हा या बॅंकेचा कणा आहे. तीव्र स्पर्धा असतानाही बॅंक शेतकऱ्यांचा चांगली सेवा पुरवते. त्यामुळे सचिव व कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या नावात वॉर्ड विनर बॅंक हे शब्द समाविष्ट करावेत की काय इतकं अभिमानास्पद काम करुन बॅंकेने विविध पारितोषिके पटकावली आहेत. यावेळी राजेंद्र सरकाळे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. सुजीत शेख यांनी सूत्रसंचालन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.