कारखाना आधुनिकीकरणाचे कंपनीकडून दिले जातेय कारण
पुणे – चाकण येथे कार्यरत स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया या कंपनीतील उत्पादन डिसेंबरच्या मध्यापासून जानेवारीच्या मध्यापर्यंत थंडावणार आहे. याअगोदरही या कंपनीतील उत्पादन ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात महिनाभर थांबविले होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून वाहन कंपन्यांची विक्री होत नसल्यामुळे बऱ्याच वाहन कंपन्यांनी मर्यादित काळासाठी उत्पादन थांबविणे चालू ठेवले आहे. आगामी काही काळतरी इन्व्हेंटरी कमी करण्यासाठी कंपन्यांना या उपायोजना कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर पुढील वर्षापासून वाहनांसाठी बीएस-6 मानदंड लागू कले जाणार आहेत. त्याचाही सध्याच्या कंपन्यांच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होणार आहे.
मात्र, पुढील महिन्यात उत्पादन बंद ठेवण्याचे कारण कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचे स्कोडा कंपनीकडून सांगण्यात आले. आधुनिक उत्पादनाकरिता या कारखान्यातील यंत्रसामुग्री बदलावी लागणार आहे. त्यासाठी हे उत्पादन बंद ठेवण्यात येणार आहे. या कंपनीने भारतात बरीच गुंतवणूक केली असली तरी या कंपनीच्या उत्पादनांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, आगामी काळात भारतात आपले पाय रोवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन उत्पादने सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येते.
एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान या कंपनीची केवळ 17 हजार 733 इतकी वाहने विकली गेली. गेल्या वर्षातील याच काळाच्या तुलनेत त्यात 17 टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीचे पुण्यात 2 व औरंगाबाद येथे 1 प्रकल्प आहे. कंपनीने भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादने विकसित करण्यासाठी पुण्यात तंत्रज्ञान केंद्र सुरू केले आहे.