नवी दिल्ली – आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन शुक्रवारपासून अर्थतज्ज्ञांशी अर्थसंकल्पाच्या संदर्भात चर्चा करणार आहेत. शुक्रवारी म्हणजे 6 डिसेंबर रोजी सितारामन यांनी काही अर्थतज्ज्ञांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.
त्यानंतर अर्थमंत्री आगामी काळात इतर घटकांशी या विषयावर चर्चा करणार आहे. दुसर्या तिमाहित विकासदर केवळ 5.4% इतका नोंदला गेला आहे. विकासदर वाढविण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतील, या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
7 डिसेंबर रोजी अर्थमंत्री देशातील शेतकरी संघटनांची आणि लघुउद्योजकांच्या संघटनांची चर्चा करणार आहेत.
देशातील शेतकरी त्यांच्या पिकांना पुरेसा भाव मिळत नसल्याबद्दल अस्वस्थ आहेत. या विषयावर सितारामन शेतकरी संघटनांचे म्हणणे ऐकून घेण्याची शक्यता आहे. लघु उद्योगाची कार्यक्षमता वाढावी आणि उत्पादकता वाढावी यासाठी सरकारने बरेच प्रयत्न केले आहेत. त्यामुळे लघु उद्योगाची स्थिती बळकट होत आहे. या क्षेत्रासाठी आणखी काय करण्याची गरज आहे, या विषयावर सितारामन लघु उद्योजकांच्या संघटनांच्या प्रमुखाबरोबर चर्चा करणार आहेत.
हा सिताराम यांचा सलग आठवा अर्थसंकल्प असणार आहे. तर पुन्हा निवडून आलेल्या मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. मोदी सरकारने 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचा संकल्प केला आहे. त्या दृष्टिकोनातून लघु आणि दीर्घ पल्ल्यात काय करता येईल यासंदर्भात अर्थसंकल्पात दिशा निर्देशन अपेक्षित आहे.
अर्थमंत्री विविध क्षेत्रातील व्यक्तींबरोबर चर्चा 30 डिसेंबर पर्यंत चालू ठेवणार आहेत. उद्योजकाच्या संघटना, शिक्षण क्षेत्रातील संघटना इत्यादी बरोबरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. या अगोदर सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीचा आढावा घेण्यात येणार आहे, यावर्षी तूट 4.9% इतकी मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र त्यापेक्षाही तूट कमी होणार आहे. ही समाधानाची बाब आहे.