वडगावशेरी -नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येथील बीआरटी मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी आमदार सुनील टिंगरे तसेच माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी केल्यानंतर महापालिका प्रशासन व पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीने या मार्गाची पाहणी केली. परंतु, त्याबाबतचा अहवाल अद्यापही महापालिकेला मिळाला नसल्याने याबाबत आजी-माजी आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासकीय अधिकारी नुसतीच पाहणी करीत असून उपाय काही करत नसल्याची टीका करीत माजी आमदार पठारे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
चंदननगर, खराडी परिसरात नगर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी ही बीआरटी मार्गामुळेच होत असल्याने सदर मार्ग काढण्याबाबतची मागणी होत होती. पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक ठप्प होते. यावर कायम स्वरूपी उपायायोजनांची मागणी करण्यात आली होती. यानुसार पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पीएमपीएल अधिकाशी चर्चा करीत प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या तसेच याबाबतच्या अहवाल देण्याची सूचना केली होती. यानुसार पीएमपीएलचे प्रमुख अनंत वाघमारे, बीआरटी व्यवस्थापक, फिल्ड ऑफिसर तसेच महापालिकेचे कार्यकारी अभियंते संजय धाराव आदींनी या मार्गाची पाहणी केली होती. परंतु, पीएमपीएलकडून अभिप्राय नोंदवून त्याचा अहवाल महापालिकेला अद्यापही दिलेला नसल्याने याप्रश्नी कोणताच निर्णय झालेला नाही.
नगर महामार्गाची पाहणी करून अहवाल देण्यात येईल त्यानंतर तातडीने वाहतूक कोंडीवर उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले होते. परंतु, याबाबत काहीच हालचाली दिसत नाही. यामुळे पुन्हा आंदोलनाची तयारी केली आहे.
– बापूसाहेब पठारे, माजी आमदार, वडगावशेरी
नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाच्या संयुक्त पाहणीचा अहवाल मिळाल्यानंतर वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत काय उपायोजना कराव्या लागतील, याचा योग्य निर्णय घेता येईल. येत्या काही दिवसांत यावर निर्णय घेऊ.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, मनपा