टंचाईचे सावट हे मानवनिर्मितच : पाचपुते

श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्‍याला वरदान ठरणाऱ्या कुकडीच्या आवर्तनाची जबाबदारी घेऊन ज्यांनी योग्य नियोजन करायला हवं होतं त्यांनी ते केलं नाही. म्हणून आज दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवत आहे. श्रीगोंदा तालुक्‍यावर आलेले टंचाईचे सावट हे निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित असल्याचा आरोप माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. पाचपुते म्हणाले, फेब्रुवारीमध्ये सव्वा नऊ टीएमसी पाणी असताना तातडीने बैठक घेऊन पाणी सोडावे, अशी मागणी तालुक्‍याची जबाबदारी घेऊन संबंधितांनी का केली नाही? जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना चुकीचा अहवाल दिला अन आवर्तन लांबणीवर पडले. ज्यावेळी कुकडी सल्लागार समितीची बैठक झाली.

तीला मी आजारी असल्याने त्या बैठकीस उपस्थित राहू शकलो नाही. मात्र जे या बैठकीत हजर होते त्यांनी पाण्याबाबत आक्रमक भूमिका घेऊन शासनाला पाणी सोडण्यास भाग पडायला हवे होते. दुर्दैवाने तसे झाले नाही. दरम्यान काळात वेळ वाया गेला. वेळीच पाणी सुटले असते तर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान टाळता आले असते. त्यामुळे उदभवलेली टंचाईची परिस्थिती ही निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच पण अधिक नुकसान होऊ नये म्हणून मी आजारी असताना देखील तातडीने पाणी सोडण्याची मागणी प्रशासनास केली. त्याचा पाठपुरावा केला. मात्र वरच्या भागात आंदोलन सुरू झाले. मुख्यमंत्र्यांना या बाबत कल्पना देऊन पोलीस बंदोबस्त देण्याची विनंती केली. पोलीस बंदोबस्तात माणिकडोहमधून येडगावमध्ये पाणी आले. तत्पूर्वी वरच्या भागात कालवे सुरू असल्याने पाणीपातळी खालावली.

दरम्यानच्या काळात काही दिवसांचा अवधी गेला. मात्र मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे सतत केलेल्या पाठपुराव्यास यश आले. या सर्व घडामोडीत ज्यांचा सहभाग तालुक्‍याला अपेक्षित होता, त्यांनी तो घेतला तर नाहीच उलट पाणी येणारच नाही आलं तर मिळणारच नसल्याची आरोळी ठोकून जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण केली गेली. तालुक्‍याची जबाबदारी स्वीकारून संबंधितानी आक्रमक पवित्रा घेतला असता तर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान टाळता आले असते, दुर्दैवाने ते घडले नसल्याची खंत पाचपुते यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.