शिरूर : निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर येथील रांजणगाव गणपती ते निमगाव म्हाळुंगी या दोन मुख्य गावांना जोडणाऱ्या मुख्य जिल्हा मार्ग क्र. १९ हा पालखी मार्गाबाबत ठळक अश्या खुणा तसेच रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत वर्षानुवर्षे वाद असल्यामुळे सदर रस्ता बंद करण्यात आला होता. सदर रस्ता व जमिनींचे वाद कायमस्वरूपी मिटवण्याकरिता मनसेचे तालुकाध्यक्ष तेजस यादव, शेतकरी यांनी उपअधीक्षक, भूमी अभिलेख, कार्यालय, शिरूर यांची भेट घेत जमिनींच्या वादाबाबत बैठक तोडगा काढण्यासाठी एकत्रित हद्दकायमची मोजणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले, त्यानुसार सदर बैठकीदरम्यान १०० शेतकऱ्यांनी ५०० एकर जमीन मोजणीसाठी शासकीय जमीन मोजणी शुल्क भरण्याबाबत सहमती दर्शविली.
त्यानुसार सर्व शेतकरी बांधवांनी ऑनलाईन मोजणी शुल्क भरल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून संबंधित गटांच्या हद्द कायम मोजणी करीता सातत्याने पाठपुरावा करत असताना भूमी अभिलेख कार्यालयाकडून सदर गटांच्या मोजणी करीता वेळ देण्यात आली. त्यानुसार आपल्या भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक नितीन कराळे, रामपाल राठोड व अमोल गजरे यांच्याकडून १०० शेतकऱ्यांच्या ५०० एकर जमिनींची तीन ते चार दिवसात मोजणी पार पडली असून नुकतीच सदर गटांच्या हद्दी देखील कायम करण्यात आल्या आहे.
सदरच्या रस्त्याच्या व जमिनीच्या वादाचा प्रश्न मार्गी लावल्याने मनसेचे तालुकाध्यक्ष तेजस यादव, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने अमोल भोसले, उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांचा सत्कार करण्यात आला असून यावेळी शेतकऱ्यांच्या जमीनीच्या हद्दकायमच्या ‘क’ प्रतींचे वाटप करण्यात आले. हे प्रकरण यशस्वी करण्यासाठी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव जयेश शिंदे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असून यासमवेत पंचायत समितीचे सदस्य विजय रणसिंग, निमगाव म्हाळुंगीचे माजी उपसरपंच भरत विधाटे, माजी सरपंच राजेंद्र विधाटे तसेच सर्व स्थानिक शेतकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या जमिनींच्या हद्दी कायम नसल्याने तसेच रस्त्याच्या खुणा अंतिम केल्या नसल्याने याबाबत स्थानिक शेतकरी व भूमी अभिलेख प्रशासनाच्या मदतीने १०० शेतकऱ्यांच्या ५०० एकर जमिनींची नुकतीच एकत्रित हद्द कायम मोजणी पार पडली असून शेतकऱ्यांच्या हद्दी देखील कायम करण्यात आल्या आहेत. स्मार्ट व्हिलेज अंतर्गत राबविलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला असून यानिमित्त सहकार्य केलेले भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक अमोल भोसले व त्यांच्या प्रशासनाचे देखील आभार !
– तेजस यादव, तालुकाध्यक्ष, मनसे, शिरूर – हवेलीनिमगाव म्हाळुंगी येथील राजकीय पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ यांनी एकत्र येत एक चांगला, अनोखा व स्तुत्य उपक्रम प्रशासनाच्या सहाय्याने राबविला आहे. एकाच गावातील जवळपास ५०० एकर जमिनीचा १०० शेतकऱ्यांचा शेकडो वर्षापासून प्रलंबित असणारा रस्त्याचा, जमिनीच्या बांधाचा विषय सामंजस्याने मिटविला. मनसे तालुका अध्यक्ष तेजस यादव, स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांच्या सहकार्याने १०० मोजणी प्रकरणे यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून संपूर्ण तालुक्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच यापुढे कौटुंबिक खातेफोड करून पोटहिस्से करण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करणार आहोत.
अमोल भोसले, उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, शिरूर