ऑनलाईन दस्त डाउनलोड होण्यास येणारी अडचण तातडीने दूर करावी

पुणे बार असोसिएशनची मागणी

पुणे – ऑन लाईन दस्त डाऊनलोड होण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. या अडचणी तातडीने दुर काराव्यात अीा मागणी पुणे बार असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. ही मागणी नोंदणी व मुद्रांक विभागाचे नोंदणी महानिरीक्षक यांचेकडे पत्राद्वारे केलेली आहे.

स्थावर मालमत्तेची खरेदी करण्यापूर्वी शोध व शीर्षक अहवाल घेतला जातो. शोध व शीर्षक अहवाल घेण्याकरीता मिळकतीचे पूर्वी नोंदणी झालेले दस्त बघितले जातात. सदर दस्तांची साक्षांकित प्रत नक्कल फी भरून नोंदणी झालेल्या संबंधित दुय्यम निबंधक कार्यालय व http://igrmaharashtra.gov.in या अधिकृत शासकीय वेबसाइटवर मिळते. सध्या पुणे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी टाळण्याच्या उद्देशाने पूर्वी नोंदणी झालेल्या दस्तांची साक्षांकित प्रत देणे तात्पुरते बंद केलेले आहे. त्यामुळे वकील व पक्षकारांना दस्तांची साक्षांकित प्रत मिळण्यासाठी ऑनलाइन सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे.

परंतु, गेल्या 15-20 दिवसांपासून http://igrmaharashtra.gov.in या अधिकृत शासकीय वेबसाइटवर सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने शुल्क भरूनही दस्त डाउनलोड होत नाही. याबाबत आयजीआर हेल्पलाईनशी वारंवार तक्रार करूनही अद्याप समस्येचे निराकरण झालेले नाही. यामुळे वकील व पक्षकारांना नाहक त्रासाला सामोरे जावे आहे. लॉंकडाऊनमुळे आधीच अर्थचक्र बिघडलेले असताना केवळ सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे वकील वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाच्या महसुलाची देखील हानी होत आहे.

तरी दस्त डाउनलोड होण्यास येणारी अडचण तातडीने दूर करावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशनचे सदस्य ऍड. आनंद धोत्रे, ऍड. आकाश मुसळे, ऍड. सचिन पोटे (पाटील) व ऍड. अमोल तनपुरे यांनी नोंदणी व मुद्रांक विभागाचे नोंदणी महानिरीक्षक यांचेकडे पत्राद्वारे केलेली आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.