- महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातील निष्कर्ष
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील हॉस्पिटलमधून निर्माण होत असलेल्या जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस उग्र होत आहे. दोन वर्षांपूर्वी शहरात तीन लाख 75 हजार किलो ग्रॅम जैववैद्यकीय कचरा निर्माण होत होता. त्यामध्ये वाढ होऊन गेल्या वर्षी चार लाख 21 हजार किलोग्रॅम कचरा निर्माण झाला. तर 2019 – 20 मध्ये त्यात आणखी वाढ होऊन 5 लाख 87 हजार 422 किलो ग्रॅम जैववैद्यकीय कचऱ्याची निर्मिती झाल्याची नोंद आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. हा कचरा पर्यावरणास हानिकारक असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आला आहे.
एकीकडे शहरात घरगुती व व्यावसायिक कचऱ्यातून रोज निर्माण होणाऱ्या 1000 ते 1050 मेट्रिक टन ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे काय करावे ही समस्या महापालिकेला भेडसावत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. तर दुसरीकडे जैव वैद्यकीय कचऱ्याचे नवे आव्हान आता उभे ठाकले आहे. गेल्या वर्षभरातील करोना परिस्थितीमुळे हे आव्हान आणखी गडद होत चालल्याचे चित्र आहे. हे असेच सुरू राहिले तर येत्या दहा ते पंधरा वर्षांत पर्यावरणाच्या गंभीर परिणामांचा सामना करावा लागणार आहे. असा दावा यंदाच्या पर्यावरण अहवालात करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित पर्यावरण सद्यस्थिती अहवाल बनविणे महापालिकांना बंधनकारक आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरांतील विविध घटकांचा अभ्यास करून 2019-20 चा पर्यावरण अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये वाढत्या जैववैद्यकीय व घनकचऱ्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापन म्हणजे केवळ कचरा एकत्रित करून त्याची जाळून किंवा पुरून विल्हेवाट लावणे नव्हे; तर कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करून त्याचा पुनवार्पर किंवा त्यावर प्रक्रियेद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे होय. यासाठी केंद्र व राज्य सरकारने केलेले कायदे आणि नियमांची अंमलबजावणी करणे महापालिकेची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दैनंदिन कचऱ्याची समस्या जटील
सन 2016 – 17 प्रतिदिन 811.1 मेट्रिक टन
सन 2017 – 18 प्रतिदिन 850 मेट्रिक टन
सन 2018 – 19 प्रतिदिन 916.165 मेट्रिक टन
सन 2019 – 20 प्रतिदिन 1000 ते 1050 मेट्रिक टन