नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ माजली होती. या धमकीनंतर नागपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध लावला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फोन करणारी व्यक्ती ही खुनाच्या गुन्हामध्ये बेळगाव येथील तुरुंगात शिक्षा भोगत असून, जयेश कंठा असे या आरोपीचे नाव आहे. या व्यक्तीने तुरुंगातूनच गडकरींच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. त्याची चौकशीही सुरू केलीय. पण 72 तास उलटले तरी त्याच्याकडील मोबाईल सापडत नाहीये. मोबाईल कुठे ठेवला हे सांगणं तर सोडाच पण उलट हा कैदी पोलिसांनाच आधी तो मोबाईल घेऊन या, मगच आरोप करा, असं आव्हान देत आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
पोलिसांनी त्याला अनेक अंगाने प्रश्न केले. पण तो काही पोलिसांना ताकासतूर लागू देत नाहीये. त्यामुळे करावं तरी काय? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. उलट जाओ पहले फोन लेके आवो, अशी डायलॉगबाजी हा कैदी करत आहे. तुम्ही जो मोबाईल माझा आहे असं सांगताय आधी तो मोबाईल शोधा. त्यातील सीम कार्डही शोधा, असं आव्हानच हा कैदी पोलिसांना देत आहे. त्यामुळे 72 तासानंतरही फोन सापडत नसल्याने पोलिसांना मोठं अपयश आलं आहे..