औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील कारागृहातून खूनाच्या आरोपात शिक्षा भोगत असलेला एक कैदी आज पसार झाल्याची घटना घडली आहे. अकलन रिसू भोसले असे या फरारी कैद्याचे नाव आहे.
त्याला कारागृहाशी संबंधीत शेतात काम करण्यासाठी नेले असताना तेथून तो पोलिसांची नजर चुकवून पळाला. सन 2011 पासून तो कैदेची शिक्षा भोगत आहे. त्याला यावर्षी जून महिन्यात नाशिक कारागृहातून पैठणच्या कारागृहात हलवण्यात आले होते. कारागृहाच्या आवारातच कांद्याचे शेत आहे.
त्याला तेथे कामासाठी नेण्यात आले असता त्याने तेथून पोबारा केला. या कारागृहातून एकूण चार कैदी वेगवेळ्या कालावधीत पळून गेले आहेत, त्यातील एकाला पकडण्यात पोलिसांना या आले आहे.
पैठणच्या कारागृहात खुले कारागृहाची संकल्पना राबवण्यात येत असून कैद्याला कोठडीत डांबण्यापेक्षा त्याला खुल्या वातावरणात काम करण्याची संधी दिली जाते त्याचा गैरफायदा हे लोक काही वेळा घेतात असे कारागृहातील अधिकाऱ्यांनी सांगितले. फरारी कैद्याच्या तपासासाठी पोलिस कार्यरत आहेत.