निवडणुकीमुळे प्रिंटिंग प्रेस व्यवसायाला झळाळी

उमेदवारांची पत्रके, जाहीरनामे, अन्य छपाईच्या कामांची घाई

सातारा – निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर आता निर्णायक टप्पा येवून ठेपला आहे. अखेरचं धुमशान टप्प्यात आलं आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांची पत्रके, जाहीरनामे यासाठी त्यांच्या टीमची चांगलीच धांदल सुरू आहे. तहान-भूक हरवून आपल्या उमेदवारासाठी ही मंडळी काम करताना दिसत आहेत. प्रचाराचा मुख्य कालावधी आता सुरू झाला आहे. त्यासाठी उमेदवार व त्यांच्या विश्‍वातील महत्वपूर्ण टीम काम करत आहे. पत्रके, जाहीरनामे व अन्य साहित्य छपाई व वाटप सुरू आहे. अनेकांनी अगोदरच ही कामे उरकली असली तरी नवीन अपडेट घेवून पुन्हा ही कामे वेग घेत आहेत. त्यामुळे प्रिंटिंग प्रेस व्यवसायाला झळाळी मिळाली आहे.

उमेदवारांच्या पत्रके, जाहीरनामे तसेच अन्य छपाईच्या कामामुळे या व्यावसायिकांची चांदी झाली आहे. अनेक व्यावसायिकांकडे प्रिंटिंगसाठी कामाच्या रांगा लागल्या असून, कामे पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस केला जात आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रिंटिंग व्यावसायिक सज्ज झाले होते. पत्रके हॅण्डबिल, जाहीरनामे, टी शर्ट, उपरणे, झेंडे यांचे तात्पुरते डिझाइन करून ठेवण्यात आले होते. ऑर्डर येताच प्रतींची संख्या, प्रकाशकाचे नाव, उमेदवाराचा फोटो टाकून डिझाइन्स फायनल झाले की प्रिंटिंगला देणे इतकेच काम बाकी ठेवले होते.

सातारा शहरासह जिल्ह्यात अनेक मोठ्या प्रिंटिंग व्यावसायिकांकडे निवडणुकीची कामे सुरू आहेत. काही उमेदवारांनी गतकाळात कोणती कामे केली हे मतदारांना दाखवण्यासाठी वर्तमानपत्राची कात्रणे जमवून त्याचे पुस्तक तयार केले आहे. प्रचारपत्रकेतील कंटेन्टदेखील तयार आहे. एखाद्या उमेदवाराला अमूक एक कंटेन्ट आवडला की त्यावर त्या उमेदवाराचा फोटो, नाव टाकून प्रतींची संख्या टाकल्यास एक ते दीड दिवसात काम उमेदवाराच्या घरी पोहचते होत आहे.

पक्षाच्या जाहीरनाम्याबरोबरच स्थानिक जाहीरनामेसुद्धा करण्यात आले आहेत. काही उमेदवारांनी चार पानी जाहीरनामे तयार केले आहेत. तर काहींनी आठ पानी जाहीरनामे तयार केले आहेत. एकापेक्षा दोन उमेदवारांनी एकाच प्रिटिंग व्यावसायिकाकडे काम दिल्याने दोन पक्षांची जबाबदारी एका प्रिंटिंग व्यावसायिकाला पार पाडावी लागत आहे. शेवटच्या टप्प्यात स्लिपा छापल्या जाणार आहेत. त्याचे काम पूर्ण झाले असून, एक ते दोन दिवसात डाटा उमेदवाराकडे दिला जाणार आहे. विभागनिहाय त्याचे वाटप होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.