मुद्रणालयेही निवडणूक आयोगाच्या रडारवर

पिंपरी -लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रचार पत्रके, घोषणाफलक किंवा भित्तीपत्रके छपाई करून देणाऱ्या प्रिटींग प्रेस चालकावरही आता अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. मुद्रकांचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिद्ध करण्याबरोबरच प्रकाशकांची ओळख पटवणारे प्रतिज्ञापत्रही घ्यावे लागणार आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 127 अ द्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या (प्रिटींग प्रेस) चालक व मालकाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

हाताने नक्कल काढण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक प्रती काढण्यात आलेले निवडणुकीसंबंधीचे प्रत्येक पत्र, हस्तपत्रक, घोषणाफलक किंवा भित्तीपत्रक यांच्या दर्शनी भागावर मुद्रकांचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता प्रसिध्द करणे बंधनकारक आहे. असे कोणतेही पत्रक प्रसिद्ध करताना प्रिटींग प्रेस चालकाने इच्छूक प्रकाशकाकडून दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले प्रकाशकांची ओळख पटवणारे प्रतिज्ञापत्र घेणे अत्यावश्‍यक आहे.

दस्तऐवज छापण्यात आल्यावर प्रिटींग प्रेस चालकाने प्रतिज्ञापत्राची एक प्रत व पत्रकांच्या चार प्रती जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तीन दिवसांत सादर कराव्यात. त्यासोबत छपाई केलेल्या किती मोबदला घेतला याबाबत माहिती देण्यात यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाने केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.