प्राचार्यांची कविता “फुलोरा’त बहरली

पुणे – मनावर फुंकर घालणारी, माणसातला बुलंद आशावाद जिवंत ठेवणारी, माणूस हाच देवाचा अंश मानणारी डॉ. राजेंद्र झुंजारराव यांची कविता “फुलोरा’ मध्ये बहरली आहे. आनंदाच्या उर्मीतून जन्मलेली ही कविता असून, त्याला अंतःकरणातील सच्चेपणाचा सुगंध असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्‍त केली.

मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कवी डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या “फुलोरा’ या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा डॉ. श्रीपाल सबनीस, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी संस्थेचे सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, कार्यवाह प्रा. शामंकात देशमुख, डॉ. निवेदिता एकबोटे, रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षक मंडळाचे सदस्य डॉ.महेश थोरवे आदी उपस्थित होते.

कविता ही माणसाला जिवंत ठेवते. प्रत्येकाने लेखन किंवा अन्य कोणता तरी छंद जोपासायला हवा. कवींच्या तत्त्व चिंतकांचे उत्तम दर्शन या संग्रहातून घडते, असे सबनीस यांनी म्हटले. कवीच्या स्वप्नांचे विविध रंग या कवितेत दिसून येतात, असे डॉ. महेश थोरवे यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. झुंजारराव म्हणाले, जगताना आयुष्याशी एकरूप होत गेलो, जगण्यातल्या प्रत्येक क्षणाला न्याय देत गेलो आणि ही कविता नकळत आकाराला आली. सूत्रसंचालन अंजली सरदेसाई यांनी, तर साहित्य विश्व प्रकाशनाचे प्रकाशक डॉ. विक्रम शिंदे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.