पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रत्येक शंकेचे समाधान करण्यासाठी 24 तास तयार, पण…

धोरडो, (गुजरात) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज असा दावा केला आहे की, त्यांच्या सरकारला देशातील शेतकऱ्यांचा आशीर्वाद लाभला आहे आणि हीच ताकद शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करणारे आणि शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून चालवणाऱ्यांनाच हरवणार आहे.

मोदी यांनी आज येथील एका कार्यक्रमादरम्यान म्हटले की, आजकाल दिल्लीच्या आजुबाजूला आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना द्विभ्रमित करण्याचा कट रचला जात आहे. त्यांना अशा पद्धतीने घाबरवण्यात येत आहे की, शेतकऱ्यांच्या जमिनीवरच सरकार ताबा घेणार आहे.

कृषी सुधारणेची मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. कारण शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन त्यांच्या इच्छेप्रमाणे पाहिजे त्या ठिकाणी विकता यावे. मात्र आताचा विरोधी पक्ष जेव्हा सत्तेत होता तेव्हा त्यांच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. मात्र आताच्या सरकारने हे ऐतिहासिक कृषी कायदे बनविले. त्यामुळे विरोधी पक्ष शेतकऱ्यांना याबाबत द्विभ्रमित करीत आहे.

मोदी पुढे म्हणाले की, दुग्ध उत्पादकांना ज्याप्रकारे कुठेही दूध विकण्याचे स्वातंत्र्य आहे, अगदी त्याप्रमाणेच अन्नधान्य आणि डाळी इत्यादीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना याप्रकारचे स्वातंत्र्य पाहिजेच.

दुग्ध उत्पादकांकडून दूध विकत घेणारी डेअरी त्यांचे पशुधन हिसकावून घेते का? असा प्रश्‍नही मोदी यांनी यावेळी विचारला. पंतप्रधांनी दावा केला की, सरकार शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी 24 तास तयार आहे.

मोदी पुढे म्हणाले की, शेतकरी भावाबहिणींना आमचे सरकार नेहमीच प्राधान्य देत आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेतीवरील खर्च कमी व्हावा आणि शेतकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी सरकार काम करीत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.