US-Israel-Iran War – इराण-अमेरिका युद्धामुळे केवळ पेट्रोल-डिझेलच नाही, तर आता तुमच्या स्वयंपाकघरातील प्लास्टिकचे डबे, बादल्या आणि अगदी औषधांच्या किमतीही कडाडणार आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या मालाच्या (पॉलिमर) किमतीत मोठी वाढ झाली आहे. भारतातील अनेक कंपन्यांनी प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ केल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, होमोपॉलिमर पॉलीप्रोपाईलीनच्या किमतीत प्रति टन ४,००० रुपयांची, तर कोपॉलिमर आणि पॉलीइथिलीनच्या दरात प्रति टन ७,००० रुपयांची वाढ झाली आहे. या महिन्यात तब्बल चार वेळा (१, ३, ११ आणि २५ मार्च) हे दर वाढवण्यात आले आहेत. पॉलिमरचा वापर दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंमध्ये होतो. विशेष बाब म्हणजे, प्लास्टिक दरवाढीचा फटका आरोग्य क्षेत्रालाही बसणार आहे. ‘असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाईस इंडस्ट्री’ नुसार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे प्लास्टिकच्या खर्चात ५०-६० टक्के वाढ झाली आहे. यामुळे इंजेक्शनच्या सिरिंज, आयव्ही बाटल्या, डायग्नोस्टिक किट आणि औषधांचे पॅकेजिंग, सर्जिकल हातमोजे यांच्या किमती एप्रिल महिन्यापासून वाढू शकतात. तज्ज्ञांच्या मते, कंपन्या अचानक किमती वाढवण्याऐवजी उत्पादनाचे वजन किंवा आकार कमी करू शकतात. उदाहरणार्थ, १० रुपयांच्या बिस्किट पुड्याची किंमत तीच ठेवून त्यातील बिस्किटांची संख्या कमी केली जाऊ शकते.