मंचर, दि. 20 (प्रतिनिधी) – आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात पूर्वहंगामी बटाट्याची काढणी सध्या सुरू झाली आहे. बटाट्याचे उत्पन्न चांगले मिळत असून, बाजारभावही चांगला असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेताच्या बांधावरच सध्या 37 ते 38 रुपये प्रति किलो या दराने बटाट्याची खरेदी व्यापारी करत आहे.
मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून अनेक शेतकऱ्यांनी बटाटा वाण खरेदी करून बटाटा लागवड केली. पूर्वहंगामी बटाटा लागवडीस पावसापासून मोठ्या प्रमाणात धोका असतो. वातावरणातही सातत्याने बदल होत असतात, त्यामुळे पूर्वहंगामी बटाट्याची लागवड शेतकरी करत नाहीत; परंतु मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतील बटाटा वाण व्यापारी संजय मोरे यांच्याकडून कुमशेत (ता. जुन्नर) येथील सदानंद डोके यांनी बटाटा वाण खरेदी करून बटाट्याची लागवड केली. या बटाट्याची काढणी सध्या सुरू असून, शेताच्या बांधावर त्यांना 3 हजार 750 रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे. त्यांनी 4 हजार 200 रुपये प्रति क्विंटल या दराने बटाटा वाण खरेदी करून बटाटा लागवड केली होती. खते, औषधे फवारणी, मजुरी हा मोठ्या प्रमाणावर खर्च केला होता. 55 किलो बटाटा वाणाची लागवडीनुसार बटाट्याचे गळीत बारा पट झाले. मोठा भांडवली खर्च करून बटाट्याचे चांगले उत्पादन मिळवले आहे.