सरकी पेंडीचा भाव भडकला

राज्यातील मिल्स बंद असल्याने शेतकऱ्यावर बोजा : पशूखाद्य अडीच हजारांवर ठेपला

नीलकंठ मोहिते

रेडा- राज्यातील तेल मिल्स बंद असल्याने व गुजरात तसेच आंध्र प्रदेशातून आवक सुरू असल्याने सरकी ढेपेचा दर गगनाला भिडला आहे. नेहमी दीड हजार रुपये प्रति क्‍विंटलने मिळणारी सरकी ढेप चक्‍क अडीच हजार ते तीन हजारापर्यंत गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव जनावरांसाठी खरेदी करावी लागत आहे. सरकीचा हा दर पशुपालकांच्या आवाक्‍याबाहेरचा असला तरीदेखील त्यांचा नाईलाज झाला आहे. एकीकडे दुधाच्या किमती स्थिर असताना याच जनावरांना दुधासाठी पशूखाद्य सरकी पेंड महागली असल्याने दुभती जनावरे सांभाळण्यासाठी शेतकऱ्याला मोठी कसरत करावी लागत आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यासह इतर तालुक्‍याच्या हद्दीत परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली पिके नेस्तनाबूत झाले आहेत. शेतकऱ्यांना याच पिकातून हक्‍काचा पैसा मिळणार होता. परंतु ही पिके पावसामुळष बरबाद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून नेला आहे. तरीदेखील शेतीला जोडधंदा म्हणून दारात दुग्ध व्यवसाय प्रत्येक घरटी इंदापूर तालुक्‍यामध्ये केला जातो. शेतकऱ्यांकडे दुधाळ गाई, म्हशी मोठ्या प्रमाणात आहेत. दूध देणाऱ्या जनावरांना सरकी पेंडचा घास द्यावाच लागतो. आता पिकातून मिळणारा पैसा पाण्यात गेला असताना शेतकऱ्यांना जनावरांसाठी सरकी पेंड लागते. ही खरेदी शेतकरी पदरमोड करून करीत आहे. शेतकऱ्यांकडे सध्या कोणतीही आर्थिक बाजू खंबीर नाही. तरीदेखील खाद्य घालावेच लागते. त्यामुळे सरकी पेंडीचे दर वाढले असतानाही उसनवारी पैसे घेऊन खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सध्या पश्‍चिम महाराष्ट्रात व खानदेशात कापसाचा हंगाम लांबणीवर पडला आहे. उपलब्ध होणारा कापूस व सरकीमध्ये प्रचंड आर्द्रता असल्यामुळे ढेप निर्मिती करताना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. सरकीचा दर व निर्माण होणाऱ्या ढेपेचे उत्पादन परवडणारे नाही. त्यामुळे तूर्तास तरी सरकी पेंड स्वस्त होईल, याचा शक्‍यता मावळत आहे. दरवर्षी राज्यात कापसाचा हंगाम दसऱ्याच्या आसपास सुरू होतो. त्यामुळे कापूस वेचण्यासाठी सुरुवात होते. मात्र सध्यस्थितीला सप्टेंबरमध्ये संततधार व ऑक्‍टोबरमध्ये परतीचा मुसळधार पाऊस सर्वदूर पडला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सातत्याने परतीच्या पावसामुळे कापूस ओला झाल्यामुळे त्यातील दर्जा निकृष्ट झाला आहे. कापूस उत्पादकांच्या शेतीमध्ये कापसाच्या बोंडातून सरकीचे अंकुर नवे फुटल्याने कापसाचा हंगाम पुढच्या कालावधीसाठी गेला आहे, याचा थेट परिणाम सरकी पेंडीवर झालेला आहे. राज्यातील जिनिंग मशीन अनेक ठिकाणी बंद असल्यामुळे जिनिंग मिल्स उत्पादन नसल्यामुळे सरकी पेंड तयार होत नाही.

व्यापाऱ्यांनी जुनी सरकी वापरली तर चेदर निर्माण होणाऱ्या पेंडीचा ताळमेळ बसत नाही. सध्या इंदापूर व बारामती तालुक्‍यामध्ये 2 हजार 700 ते 3 हजारांपर्यंत चांगली सरकी पेंड प्रतिक्‍विंटल विक्री केली जात आहे.

  • इंदापूर तालुक्‍यांमध्ये दूध व्यवसाय करणारे असंख्य शेतकरी आहेत. जर मुक्‍या जनावरांना सरकी पेंड व इतर प्रकारची पेंड खाद्य म्हणून वापरले नाहीतर दुधाला मोठा परिणाम होतो. त्यामुळे दर जास्तीचे असतानाही शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तरी देखील चढ्या दराने सरकी पेंड शेतकऱ्यांना घ्यावी लागते आहे. त्यामुळे पावसाने झालेली नापिकी याचा विचार करून शासनस्तरावरून दुधाळ जनावरांसाठी मोफत सरकी पेंड उपलब्ध करून द्यावी.
    – साहेबराव मोहिते, आदर्श शेतकरी.
  • सरकी पेंडीचे दर खाली येतील
    सध्या मिल्स बंद असल्यामुळे सरकी पेंडीचे दर वाढले आहेत. परंतु राज्यात कापूस हंगामाला सुरुवात झाल्यानंतर सरकीचे व ढेपेचाही दर आटोक्‍यात येणार आहे. आत्ताच्या दरापेक्षा किमान पाचशे रुपये दर प्रति क्‍विंटलला कमी होईल. सरकीचे दर देखील खाली येतील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्‍त केला आहे.
  • ओल्या कापसाचा परिणाम
    शेतकऱ्यांच्या शेतातून काही प्रमाणात कापूस निघत असला तरीदेखील त्या निघणाऱ्या कापसामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. जवळपास 25 ते 30 टक्‍के कापसामध्ये ओलावा असल्यामुळे कापसावर प्रक्रिया करणाऱ्या मिल्स बंद आहेत. याचा परिणाम सरकीच्या तुटवड्याचा येत आहे. राज्यात येत असणारी सरकी गुजरात व आंध्रप्रदेशातून येत आहे. त्यामुळे ट्रॉन्सपोर्टचा खर्च अधिकचा होत आहे. त्यामुळेच सरकीचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचा भार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.