सोन्याचे दर वाढले 40 टक्क्यांनी तर चांदीचे 65 टक्क्यांनी
मुंबई – मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे व डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. या कालावधीत सोन्याचे दर 40 टक्क्यांनी तर चांदीचे दर तब्बल 65 टक्क्यांनी वाढले आहेत.
गेल्या तीन आठवड्यांत तर गुंतवणूकदारांचा मोर्चा चांदीकडे जास्त प्रमाणात वाढला असून या तीन आठवड्यात चांदीचे दर तब्बल 45 टक्क्यांनी वाढले आहेत. याची कारणमीमांसा करताना विश्लेषकांनी सांगितले की, एकतर गुंतवणूक म्हणून चांदी काही गुंतवणूकदारांना आकर्षक वाटत आहे. त्याचबरोबर आगामी काळात औद्योगिक उत्पादन वाढणार असल्यामुळे या क्षेत्रात चांदीचा वापर वाढू शकतो. त्या अवस्थेत चांदी नजीकच्या भविष्यात अधिक नफादायक ठरेल, असे वाटणारे गुंतवणूकदार चांदी खरेदी करीत आहेत.
दरम्यानच्या काळामध्ये जागतिक पातळीवर गुंतवणुकीचे साधन असलेला डॉलर 2 वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेला आहे.त्यामुळे जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. त्याचबरोबर सोन्याचे दर ज्या प्रमाणात वाढतात त्या प्रमाणात चांदीची दर वाढत असतात. अनेकदा ज्या गुंतवणूकदारांकडे सोने महाग असल्यामुळे गुंतवणूक करण्याइतका पैसा नसतो असे गुंतवणूकदार चांदीचा आधार घेतात असे विश्लेषकांना वाटते. मात्र, सध्या चांदीचे दर आवश्यकतेपेक्षा जास्त उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सावध राहून चांदी खरेदीचा सल्ला विश्लेषक देतात. या वर्षी भारतामध्ये चांदीचा वापर कमी होण्याची शक्यता आहे. कारण ग्रामीण भागातून चांदीची मागणी कमी आहे. गेल्या वर्षी भारताने 6,000 चांदीची आयात केली होती.
औद्योगिक उत्पादनात चांदीचा वापर
चांदीचा बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक म्हणून उपयोग होतो. मात्र, चांदीचा खरा उपयोग विविध औद्योगिक उत्पादनात केला जातो. गेल्या काही महिन्यांत औद्योगिक उत्पादन थंडावले होते. ते वेगात सुरू करण्यासाठी कंपन्या आणि सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आगामी काळात औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वापर वाढण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदार चांदी खरेदी करून ठेवीत असल्याचे दिसून येते.