मास्क व सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण येणार

राज्य सरकारकडून समिती स्थापन

मुंबई – करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असल्याने मास्क व सॅनिटायझरला मोठी मागणी आहे. त्यामुळे त्याची अव्वाच्या सव्वा किंमतीला विक्री केली जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहे. या पार्श्‍वभूमीवर या वस्तूंच्या किंमतींवर नियंत्रण आणले जाणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत.तसेच मास्क आणि सॅनिटायजरच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने चार सदस्यीय समिती नियुक्‍त केली आहे.

या वस्तूंची विक्री चढ्या भावाने केली जात आहे. केवळ 10 ते 20 रुपयांचे मास्क सध्या 50 ते 70 रुपयांना विकले जात आहेत. तसेच 90 ते 100 रुपयांच्या सॅनिटायझरची विक्री देखील दुप्पट किंवा तिप्पट दराने केली जात असल्याचे समोर आले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर नियुक्‍त केलेल्या समितीत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे अध्यक्ष असून हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य औषध नियंत्रण प्राधिकारी सहआयुक्त हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. करोनावर सध्या तरी प्रतिबंधात्मक उपाय हेच औषध असल्याने आणि नागरिकांनाही वेळोवेळी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करण्याबाबत विविध माध्यमातून आवाहन केले जात असल्याने या दोन्ही वस्तूंची मागणी वाढली आहे.

या दोन्ही बाबी नियंत्रित दराने मिळण्यासाठी त्यांच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समितीने उपाययोजना करताना मास्क आणि सॅनिटायजरच्या कमाल दर मर्यादा ठरवायच्या आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

सदर समितीला तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या दोन्ही वस्तूंच्या किंमती नियंत्रणात आल्यास सामान्यांना दिलासा मिळेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.