पोळ्यासाठी मातीचे बैल बाजारात
बेल्हे (पुणे) – भाद्रपदी पोळा गुरुवारी असून मातीच्या व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैलांना रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
यंदा सर्वत्र बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे. ज्यांच्याकडे बैल नाहीत ते शेतकरी मातीचे बैल खरेदी करतात. काळाच्या ओघात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बैल बनविले जात असल्यामुळे यावर्षी बैलांच्या किंमतही थोड्याफार प्रमाणात वाढल्या असल्याची माहिती धोंडिभाऊ विश्वासराव यांनी दिली.
बैलांना फायबरची शिंगे लावण्यात येत आहेत. या वर्षी बैलांची किंमत अगदी 50 रुपये जोडीपासून ते 650 रुपये जोडीपर्यंत आहे. मातीचे बैल थोडे बनविले जात आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बैल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पसंती जास्त असते. करोनाच्या पार्श्वभूमीवर बैल यंदा कमीच तयार केले आहेत. तसेच बाजारपेठेत बैल खरेदी करण्यासाठी ग्राहक जास्त नाहीत.