किलोसाठी किरकोळ बाजारात मोजावे लागत आहेत 90 रुपये
पुणे (प्रतिनिधी) – परदेशातून वाढलेली मागणी आणि उत्पादन घटल्याने बाजारपेठेत असलेल्या तुटवड्यामुळे आंबेमोहोर तांदळाचे भाव कडाडले आहेत. किरकोळ बाजारात एक किलो आंबेमोहर तांदळासाठी 90 रूपये मोजावे लागत आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत हेच दर कायम राहतील, असा तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी वर्तविला आहे.
आंबेमोहर तांदळाचे उत्पादन आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे घेतले जाते. महाराष्ट्रात पिकणाऱ्या आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन नगन्य आहे. दोन राज्यांतून देशात पुरवठा होतो. कोलम आणि आंबेमोहरचे भाव साधारण सारखे असतात. जास्तीच्या उत्पादनामुळे शेतकरी कोलमकडे वळाला.
परिणामी यंदा आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी झाले.त्यातच या तांदळाला परदेशातून मागणी वाढल्याचे सांगून राजेश शहा म्हणाले, डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये तांदळाचा हंगाम असतो. याकाळात बाजारात नविन तांदूळ दाखल होतो. हंगामात आंबेमोहर तांदळाची दररोज सुमारे 20 ते 30 टन इतकी आवक होते. त्यानंतर दररोज 15 ते 20 टन इतकी आवक असते. सध्या मागणी वाढल्याने आवक थांबली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात बासमती निर्यातदारांकडून परदेशात आंबेमोहोरला मागणी वाढल्याने त्यांनी आंबेमोहोरची जास्त खरेदी केली. त्यामुळे जागेवरच भाव वाढ झाली.बासमतीची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे. मात्र, हॉटेल बंद असल्याने मागणी कमी असून भावही टिकुन आहेत.