अध्यक्षाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सैनिक बॅंकेतील खातेदाराच्या खात्यातील रक्कम परस्पर काढल्याचे प्रकरण

पारनेर – येथील सैनिक बॅंकेतून खातेदारांच्या खात्यावरील रक्कम परस्पर काढल्याप्रकरणी बॅंकेचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे यांच्यासह सहा जणांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज आज फेटाळला आहे.

पारनेर सैनिक बॅंकेच्या संयुक्त खात्यातील रक्कम परस्पर काढून खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बॅंकेचे अध्यक्ष व्यवहारे यांच्यासह अधिकाऱ्यांविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी तुकाराम व्यवहारे, तत्कालीन शाखा व्यवस्थापक संजय बाजीराव कोरडे, तत्कालीन शाखाधिकारी अनिल नामदेव मापारी, तत्कालीन उपशाखाधिकारी प्रवीण नाथाजी निघुट, तत्कालीन पासिंग अधिकारी अप्पासाहेब बबन थोरात, कर्मचारी भरत गुजाबापू पाचरणे यांचा समावेश आहे.

याबाबत चंद्रकांत विठ्ठल पाचारणे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यात म्हटले आहे की, माझे व माझी पत्नी कुसुम यांचे पारनेर सैनिक सहकारी बॅंकेत संयुक्त खाते आहे. 13 जुलै 2013 रोजी सदर खात्यातून कुसुम पाचारणे यांच्या नावे काउंटर स्लीपवर अंगठा देऊन पाठीमागील बाजूस मुलाचे नाव टाकून सही केली आहे. त्यावेळी खात्यातून एकवीस हजार रुपये काढून घेतले होते. ही बाब समजल्यानंतर बॅंकेचे तत्कालीन व्यवस्थापक संजय कोरडे यांना समक्ष भेटून तोंडी तक्रार केली होती. त्यावर कोरडे यांनी तुमचे गेलेले पैसे पुन्हा तुमच्या खात्यावर टाकू. तुम्ही याबाबत तक्रार करू नका,’ असे सांगितले.

पैसे खात्यात जमा करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र पैसे मिळाले नाहीत. मात्र 30 मार्च 2014 रोजी खात्यावर असलेल्या 39 हजार 336 रुपयांपैकी 1 एप्रिल 2014 रोजी सदर खात्यावर फक्त 678 रुपये राहिले. बॅंकेचे तत्कालीन पासिंग ऑफिसर, उपशाखाधिकारी, शाखाधिकारी, शाखा व्यवस्थापक व बॅंकेच्या अध्यक्षांनी संगनमत करून सदर खात्यावरील 38 हजार 678 रुपये खातेदाराच्या संमतीशिवाय काढून घेतले. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन हा अर्ज फेटाळण्यात आला.

न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला असल्याने आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी व आमच्यावर जो अन्याय झाला आहे, त्याबाबत सखोल चौकशी होऊन आरोपींना योग्य ती शिक्षा मिळावी.

– चंद्रकांत पाचरणे, फिर्यादी

Leave A Reply

Your email address will not be published.