सातारा (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी छ. प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे प्रवेश घेतला. शासनाने ६ वर्षापूर्वी हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून घोषित केला. त्यानंतर हा विद्यार्थी दिवस देशभर होण्यासाठी दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
यासाठी आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना ७५ लाख पत्रे पाठवणार असून याची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून करणार असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी दिली.
औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेदरम्यान डॉ. बाबाससाहेब आंबेडकरांनी ‘शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि तो जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहाणार नाही’ असे विधान केले होते. या विधानाला ७५ वर्षे होत आहेत. याचे औचित्य साधून विद्यार्थी दिवसाची चळवळ अधिक व्यापक करणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यासंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद झाला असल्याचे स्पष्ट करून अरुण जावळे पुढे म्हणाले, यापूर्वी पहिल्या टप्यात महाराष्ट्रातून १ लाख २५ हजार पत्रे दिल्लीला पाठवण्याची मोहीम राबवली होती.
या मोहीमेचा परिणाम म्हणून महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७ नोव्हेबर हा दिवस भारतभर साजरा करण्यासंदर्भात सहमती दर्शवली.
तथापि अधिसूचना निघण्यापूर्वीच त्यांचा कार्यकाल संपला. त्यामुळे विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मूर्म आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा या ७५ लाख पत्रांच्या माध्यमातून साद घालणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे छ. प्रतापसिंह महाराज हायस्कूलचे विद्यार्थी होत. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल हे केवळ सातारकरांचे नाही तर या जगाचे आज प्रेरणास्थान ठरलेलं आहे.
शालेय शिक्षण चळवळ अधिक गतिमान करण्याच्या हेतूने ७ नोव्हेंबर. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच ‘विद्यार्थी दिवस’ हा अत्यंत महत्वाचा ऊर्जादायी दिवस आहे.
नवा, समृध्द, शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबबांच्या, दलित- वंचितांच्या आणि एकूणच सर्व समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल तसेच एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही.
हे पहायचे असेल तर विद्यार्थी दिवस भारतभर होणं महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करत सातारचा हा विद्यार्थी दिवस भारतभर होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचेही अरुण जावळे यांनी म्हटले आहे.