नवी दिल्ली – देशावरील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व सर्व राज्यांच्या राज्यपालांनी आज स्वेच्छेने स्वतःच्या वेतनामध्ये एका वर्षासाठी ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली असून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व राज्यपालांप्रमाणेच सर्व खासदार देखील ३० टक्के वेतन कपातीचा निर्णय घेतील.
देशावरील कोरोना संकट व त्यानंतरच्या संभाव्य आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासदारांना आपल्या लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी मिळणार निधी देखील पुढील दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आला असून यातून वाचणारे ७९०० कोटी रुपये कोरोना संकटाच्या सामना करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोषामध्ये जमा केले जातील.