जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची आज निवडणूक
नगर – मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व जिल्ह्यातच नव्हेत तर राज्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड उद्या,दि.31 डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीतून विद्यमान अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी माघार घेण्याचे जाहीर केल्याने अध्यक्षपदाची चुरस व रंगत संपल्यातच जमा आहे.
महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या विद्यमान उपाध्यक्षा राजश्री घुले यांचे नाव निश्चित असून भाजप आज रात्री होणाऱ्या बैठकीत नाव निश्चित करून सकाळी निवडीच्या वेळी जाहीर करणार आहे. उपाध्यक्षपद महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या वाट्याला असून त्यांनी व भाजपनेही अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. कोणतेच धोरण घेतलेले नाही.
दरम्यान,आज रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडी व भाजपच्या बैठका सुरुच होत्या. त्यात उद्याच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या रणनित्या आखल्या जात होत्या. महाविकास आघाडीला आमचाच अध्यक्ष-उपाध्यक्ष होईल असा आत्मविश्वास आहे. तर भाजप व विखे गट उद्याच्या निवडीत काही चमत्काराचा दावा करत असला तरी विखेंची माघार सर्व काही सांगून जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.