मास्क घालण्यास नकार देणाऱ्या ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींना कोरोनाची लागण

मेक्सिको सिटी : कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क घालणे ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. सार्वजनिक ठिकाणी कुठेही वावरताना मास्क घाला असे आवाहन जगभरातून सर्व पातळीवर केले जात आहे. अनेक ठिकाणी याबाबत कडक नियम देखील करण्यात आले आहेत. मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रे मॅन्यूल लोपेज ओब्राडेर यांना कोरोना संसर्ग झाला आहे.

मेक्सिकोमधील कोरोना परिस्थिती हातळण्यात त्यांना अपयश आल्याची टीका केली जात होती. इतकंच नाही तर मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनीही कोरोनाच्या काळात मास्क घालण्यास नकार दिला होता.

ओब्राडर यांनी ट्विट करुन स्वत:ला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. “मला कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. हे सांगताना वाईट वाटत आहे. माझ्यात कोरोनाची सामान्य लक्षणं आढळली आहेत. डॉक्टरांची टीम माझ्या तब्येतीवर देखरेख ठेवून आहे.”

ओब्राडर आज (सोमवारी) रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करणार होते. या चर्चेमध्ये रशियातील कोरोना व्हॅसिन स्पुतनिक व्ही च्या खरेदीवर चर्चा होणार होती. मेक्सिकोमध्ये अजूनही कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरु झालेली नाही. आता मेक्सिकोचे सरकार Pfizer Corona Vaccine ची खरेदी करुन ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

मेक्सिकोमध्ये आतापर्यंत दीड लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सुमारे 17 लाख लोकांना याची लागण झाली आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या सुट्टीनंतर देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.