वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी करोना लशीचा बुस्टर डोस घेतला आहे. त्यांनी फायझर लसीचा बुस्टर डोस घेतला. करोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात येत आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी बुस्टर डोस प्रभावी ठरेल असा दावा केला जात असला तरी त्यात अद्याप एकवाक्यता नाही.
शिवाय इतक्यातच बूस्टर डोसची आवश्यकता नसल्याचे तज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. असे असताना आता बायडेन यांनी बूस्टर डोस घेतल्याने अमेरिकेत आता लसीचा तिसरा डोस दिला जाण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे मानले जाते आहे.
अमेरिकेत सुरूवातीच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच संबंधित प्राधिकरणाने याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर बायडेन यांनी बुस्टर डोस घेतला. अधिकाधिक नागरिकांनी करोना लस घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. करोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम जाणवले नसल्याचे त्यांनी सांगितले.