कोंढवा -सध्याचे राज्य सरकार घटनाबाह्य व स्थगिती देणारे सरकार आहे. मंत्री मंडळ विस्तार करत नाही. महिला प्रतिनिधींना मंत्रीपदापासून वंचित ठेवत आहे. मंजूर निधी थांबवत असल्याने लोकांचे प्रश्न ते सोडवू शकत नाहीत, अशी टिका विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली.
उंड्री येथे पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आयोजित गणेश उत्सव व गौरी गणपती सजावट स्पर्धा स्पर्धेचे बक्षिस वितरण व भव्य कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष निवृत्ती आण्णा बांदल यांनी केले होते. यावेळी पवार बोलत होते.
यावेळी आमदार चेतन तुपे, आमदार निलेश लंके, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिंगबर दुर्गाडे, रविंद्र माळवदकर, माजी नगरसेवक गणेश ढोरे, योगेश ससाणे, डॉं. शंतनु जगदाळे, सुदामराव इंगळे, लक्ष्मण बांदल, संजय लोणकर, कलेश्वर घुले, जिजाबा बांदल, वसंतराव कड, दत्तोबा बांदल, रामभाऊ कसबे, दिपक बांदल, आशिष बांदल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, महत्वाच्या उत्सवात गालबोट लागताना दिसते ते थांबायला हवे. पुणे शहराची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख आहे.पुणे शहराच्या पूर्व भागात पाण्यासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न आगामी अधिवेशनात मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न आहे. निवृत्तीआण्णा बांदल हे सामान्य कुटुंबातून अतिशय कष्टातून प्रगती करणारी व्यक्ती आहे. पवार साहेबांच्या विश्वासातील लोकांपैकी बांदल हे वरच्या फळीतील व्यक्तीमत्त्व असून त्यांचे उंड्री पंचक्रोशित चांगले काम आहे. बांदल यांनी या कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या पद्धतीने केले, अशा शब्दांत पवार यांनी कौतूक केले.
आमदार चेतन तुपे म्हणाले की, दादा हा परिसर पाण्यापासून वंचित आहे. यासाठी 24/7 या योजनेला गती लागणे गरजेचे आहे. टाक्या उभ्या आहेत. पण, पाणी नाही. याप्रश्नात आपण लक्ष द्यावे. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले.
दादांना मुख्यमंत्री झाल्याचे पाहायचे आहे…
अजितदादा भावी मुख्यमंत्री आहेत. दादांना उद्याचे मुख्यमंत्री पाहायचे असेल तर, आपआपसातील हेवे-दावे बाजूला ठेवून तळागाळामध्ये पक्षाची ध्येयधोरणे पोहचवायला हवीत. दादा उंड्रीत आले आणि माझी ताकद दुपटीने वाढली आहे. हा परिसर राष्ट्रवादीमय करणार असल्याचा विश्वासही यावेळी निवृत्ती बांदल यांनी व्यक्त केला.