सोनई – सोनई सोसायटी हा अतिशय गजबलेला परिसर आहे. येथे विविध बॅंका, सोसायटी, पोस्ट ऑफिस, शालेय मुलांचे क्लासेस आणि विविध व्यावसायिक गाळे हा मार्केटचा परिसर म्हणून ओळखला जातो. पण येथे गेल्या काही दिवसांपासून मद्यपींनी आपला अड्डा बनवला आहे.
आवाराचे क्रॉंकीटीकरण झाल्यामुळे व झाडांची गार सावली असल्याने भर दुपारीच मद्यपी मद्य प्राशन करून संस्था आवारात अंगावरच्या कपडाचे भान न ठेवता आपल्या “लीलया’ दाखवतात. आरडाओरडा करून शिवीगाळ व मारामारीचे प्रकार दिवसभर चालू असतात. 15 ते 20 लोक येथे पायरीवर आपला अड्डा मांडून खुलेआम दारू पित लोळण घेतात.
येथे विविध ऑफिस असल्याने दिवसभर महिलांची वर्दळ असते. तसेच येथे कोचिंग क्लासेससाठी मुले, मुली येतात. मद्यपीमुळे शालेय मुलांवर वाईट संस्कार होण्याचा धोका आहे. यामुळे संस्थेने अशा लोकांना येथे बसण्यास मज्जाव केला पाहिजे. मद्यपी लोकांचा बंदोबस्त करावा, याबाबत सोसायटी प्रशासनाकडे विचारणा केली असता आम्ही याबाबत पोलीस स्टेशनला लेखी पत्र दिले असल्याचे सांगितले.