गुंतवणुकीतील स्त्री शक्तीचा जागर (भाग-२)

गुंतवणुकीतील स्त्री शक्तीचा जागर (भाग-१)

प्रत्येक व्यक्तीची पहिला गुरु ही आईच असते. स्त्री असो किंवा पुरुष हा त्याच्या आईकडूनच पहिले आर्थिक धडे घेत असतो. अशावेळी जर घरातील प्रत्येक  स्त्रीने आपल्या मुलांमध्ये बचतीचे व गुंतवणुकीचे महत्त्वाचे संस्कार काळानुसार केले तर येणारी भावी पिढी निश्चितच आर्थिक विषयात पारंगत होईल. संपूर्ण जगात सर्वात जास्त बचत करणारा अशी आपल्या देशाची ओळख आहे. भारतीय स्त्रिया या बचतीच्या महाकुंभात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. पारंपारिक पद्धतीतील सोन्याच्या गुंतवणुकीत, जागेच्या गुंतवणुकीत व अशाच प्रकारच्या बचतीच्या माध्यमांचा वापर स्त्रिया मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात.

बदलत्या काळानुसार म्युच्युअल फंड या आर्थिक पर्यायाचा अत्यंत कल्पक वापरही स्त्रिया मोठ्या प्रमाणावर करत आहेत. दरमहा बचत केलेली रक्कम एसआयपीच्या माध्यमातून हुशारीने स्त्रिया वाढवताना दिसत आहेत. सोन्यामध्ये गुंतवणूक न वाढवता म्युच्युअल फंडाच्या सोन्याच्या योजनांमध्ये एसआयपी करणे जास्त फायदेशीर ठरते. जागेमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंडाच्या इन्फ्रास्ट्क्चर आणि रिअल इस्टेट फंडामध्ये दीर्घकालिन एसआयपी करावी.

आर्थिक नियोजनाच्या विविध टप्प्यांवर सखोल विचार करावयास हवा. आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी लग्नाच्या खर्चासाठी तसेच त्यांना द्यावयाच्या आर्थिक भेटींसाठी दीर्घकालिन एसआयपी अथवा एकरकमी गुंतवणूक म्युच्युअल फंडाच्या डायव्हर्सिफाईड इक्विटी योजनेत कराव्यात. आज स्त्री समाजात पुरुषांच्या बरोबरीने नोकरी-व्यवसायात भाग घेत आहेत आणि यशस्वीरित्या घवघवती प्रगती करत आहेत. कमावलेल्या प्रत्येक रुपया हा योग्य पद्धतीने साठवला व वाढवला पाहिजे या उपजत असणाऱ्या गुणांमुळे स्त्रिया अतिशय हुशारीने पैशाचे व्यवहार करताना दिसतात. गुंतवणुकीचे शास्त्र हे देखील योग्य पद्धतीने आत्मसात करून प्रत्यक्षात अवलंबत असतात. छोट्या कालावधीसाठी, मध्यम कालावधीसाठी व दीर्घ कालवाधीसाठी पैशाची गुंतवणूक योग्य ठिकाणी तसेच सुरक्षित व वेगाने वाढणाऱ्या पर्यायांमध्ये केली पाहिजे

स्त्रीच्या सशक्तीकरणात आर्थिक नियोजन हा फार महत्त्वाचा गाभा आहे. व्यक्तिगत कौशल्यासोबतच निर्णयक्षमतेबाबत विचारविनिमय, निर्णय घेण्याची क्षमता व योग्य वेळी गुंतवणुकीसाठीची प्रेरणा महत्त्वाची असते. याबाबत स्त्रिया फार मोठी भूमिका अत्यंत हुशारीने पार पाडत असतात. या सर्व प्रक्रियेत आत्मविश्वास तसेच घरातील व समाजातील स्वतःचे स्थान पक्के करत असतात. स्त्रियांच्या आर्थिक सबलतेने त्यांच्यावर होणारे अन्याय व अपमानास्पद वागणुकीला चाप बसतो.

लक्ष्मीचा वास प्रत्येक घरी हा असतोच. परंतु जर लक्ष्मीला योग्य मान-सन्मान दिल्यास व तिच्या सर्वांगीण शक्तीला योग्य दिशा व संधी दिल्यास प्रत्येक घर हे आर्थिक सुबत्तेचे प्रतिक ठरेल. भारतीय अर्थव्यवस्था व देशाची प्रगती निश्चितच होणार आहे याबाबत कुणाचेही दुमत नाही आणि या सगळ्या वाटचालीत भारतीय स्त्रियांचे फार मोठे योगदान असणार आहे, हेही निश्चितच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)