दोन डझन अमेरिकन संसद सदस्यांनी व्यक्त केली अपेक्षा
वॉशिंग्टन – अमेरिका लवकरच तालिबान बरोबर शांतता करार करणार आहे. त्या घटनेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. तथापी हा करार पुर्ण पारदर्शक आणि खऱ्या आश्वासनांचा असावा अशी अपेक्षा अमेरिकेतील दोन डझन संसद सदस्यांनी व्यक्त केली आहे.
हा करार येत्या शनिवारी होणार आहे असे अमेरिका आणि तालिबान या दोघांनीही कबुल केले आहे. या संबंधात अमेरिकेतील काहीं संसद सदस्यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि विदेश मंत्र्यांना एक पत्र पाठवून हा करार करण्या आधी अमेरिकेचे प्राधान्यक्रम निश्चीत करा आणि या करारातील पारदर्शकता कायम राखा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.या करारातील कोणतीही बाब गुप्त ठेऊ नये तसेच त्याचा सारा मसुदा लोकांसाठी जाहीर केला जावा असेही त्यांनी अमेरिकन सरकारला सुचवले आहे. तालिबानबरोबर गुप्तवार्ता विभागाच्या माहितीची एकमेकांना देवाणघेवाण केली जाऊ नये आणि दोघांनी संयुक्तपणे कोणतेही दहशतवाद विरोधी अभियान राबवू नये असेही या खासदारांचे म्हणणे आहे.
आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सुचवलेल्या कोणत्याही शिफारशी डावलून अमेरिकेच्या सुरक्षेला बाधा येईल असा कोणताही करार अमेरिकेने तालिबानशी करता कामा नये, अमेरिकन लोकांची सुरक्षा तालिबानच्या हातात देण्यात येऊ नये असे मुद्देही त्यांनी उपस्थित केले आहेत. दहशतवाद विरोधी मोहीमांमध्ये अमेरिकेने तालिबानला आपला विश्वासू साथीदार मानता कामा नये असेही त्यांनी सुचित केले आहे.