सातारा – सातारा शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चेनस्नेचिंगसह घरफोडी व दुचाकी चोरीस जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता तर चोरट्यांनी चक्क यादोगोपाळ पेठेतील पोस्ट कार्यालय टार्गेट करत तेही फोडले. पोस्ट कार्यालयातून 19 हजार 600 रुपयांचे साहित्य लंपास केले असून घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 10 रोजी रात्रीच्या सुमारास येथील यादोगोपाळ पेठेत असलेल्या पोस्ट कार्यालयाचा मागील दरवाजा अज्ञात चोरट्यांनी फोडून आत प्रवेश केला. आत गेल्यानंतर चोरट्यांना रोख रक्कम काही हाती लागली नाही.
मात्र कार्यालयातील दोन मॉनेटर, प्रिंटर, कीबोर्ड, कॅमेरा, बायोमेट्रिक मशीन व जीपीएस मशीन असा एकूण 19 हजार 300 रुपयांचे इलेक्ट्रीक साहित्य चोरटयांनी लंपास केले. भरवस्तीत असलेल्या या पोस्ट कार्यालयात चोरी झाली आहे. दरम्यान, याबाबत कार्यालयातील कर्मचारी भरत बंडू मोरे, रा. कण्हेर, ता. सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करत आहेत.