संचालकपदांची सूत्रे प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती

शिक्षण विभागातील स्थिती : पूर्ण वेळ अधिकारी नियुक्तीची फाईल पडली धूळखात

पुणे – शालेय शिक्षण विभागातील अतिमहत्त्वाच्या कार्यालयातील संचालकांची पदे रिक्त आहेत. या संचालकांची सूत्रे “प्रभारी’ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहेत. या “प्रभारीं’ना महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पूर्णवेळ अधिकारी नियुक्तीची फाईल मुंबई मंत्रालयात धूळखात पडली आहे.

चालू शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाच्या अनेक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. काही बडे अधिकारी सेवाविृत्त झाले आहेत. यामुळे रिक्तपदांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे शिक्षण आयुक्तांनी याची अंमलबजावणीही केली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक गंगाधर म्हमाणे हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक मीनाक्षी राऊत यांची पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारीपदी बदली झाली आहे. मात्र, तरीही त्यांच्याकडे विभागीय शिक्षण उपसंचालकाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक व बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर हे सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे प्रशिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार शिक्षण आयुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांच्याकडे बालभारतीच्या संचालकपदाचे अतिरिक्त कामकाज देण्यात आले आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक सुनील चौहान हे अधूनमधून प्रदीर्घ रजेवर असतात. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. चौहान यांनी दोन महिन्यांपूर्वी काही खासगी कारणास्तव स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज शिक्षण आयुक्तांकडे दिला होता. मात्र, तो अर्ज त्यांनी पुन्हा मागे घेतला आहे. त्यानंतर ते पुन्हा रजेवरच गेले आहेत.

संचालकांची रिक्त पदे असलेली सर्व कार्यालये खूप महत्त्वाची आहेत. या ठिकाणी पूर्णवेळ अधिकारीच लागणार आहेत. “प्रभारी’ अधिकाऱ्यांकडे आधीच आपल्या मूळ कार्यालयातील कामकाजाचा अधिकचा व्याप आहे. त्यामुळे या सर्वच अधिकाऱ्यांची अधिकच्या कामामुळे डोकेदुखी वाढू लागली आहे हे स्षष्टच आहे. काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाईल मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांच्या स्तरावर प्रलंबित पडली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)