राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

पुणे -राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विशेषत: मुंबई शहर आणि उपनगर भागात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

नैऋत्य मोसमी (मान्सून) पावसाने उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेशचा उर्वरीत भाग आणि राजस्थानचा आणखी भागांत मजल मारली आहे. गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा येथे जोरदार पाऊस झाला असून कोकण-गोव्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. गगनबावडा येथे 120 मीमी पावसाची नोंद झाली असून तलासरी येथे 70, धानोरा, गुहागर आणि वैभववाडी येथे प्रत्येकी 60, चिखलदरा, राधानगरी, मुरूड, राजापूर येथे प्रत्येकी 50 तर अलीबाग, कणकवली, आजरा, गडचिरोली येथे 40 मीमी पावसाची नोंद झाली.

घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला
राज्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस पडल्यामुळे फेसाळणाऱ्या धबधब्यांना सुरवात झाली. त्यामुळे पर्यटकांची गर्दीही वाढू लागली आहे. मात्र, दोन दिवसांपासून घाटमाथ्यावरील पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या 24 तासांत कोयना परिसरात 50 मीमी पावसाची नोंद झाली. ताम्हीणी आणि लोणावळा परिसरात प्रत्येकी 30, दावडी, डुंगरवाडी येथे 20 तर अम्बोणे, खोपोली आणि वळवण परिसरात प्रत्येकी 10 मीमी पावसाची नोंद झाली.

पुणे शहरसह जिल्ह्यातही जोर कमी
पुणे शहर आणि जिल्ह्यातही चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कमाल आणि किमान तापमानात किंचितशी घट झाली आहे. दिवसभरात पावसाच्या दोन ते तीन हलक्‍या सरी कोसळल्या. ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवत होता. शहरात 1 जूनपासून आतापर्यंत 229.6 मीमी पावसाची नोंद झाली असून पुढील दोन दिवसांत हलक्‍या स्वरुपाचा पाऊस पडेल. तर कमाल आणि किमान तापमानातही वाढ होईल, अशी शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.