यंदा मान्सून सर्वसामान्य पडण्याची शक्‍यता

पुणे – भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसामान्य पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी, तसेच उर्वरित राज्यात सरासरी इतक्‍या पावसाची शक्‍यता अधिक आहे. पश्‍चिम किनारपट्टी, उत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्‍यता अधिक असल्याचे पूर्वानुमान साऊथ एशियन क्‍लायमेट आउटलूक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या मॉन्सूनचा आढावा आणि येत्या हंगामातील अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियाई देशांच्या फोरमची चौदावी बैठक नुकतीच नेपाळच्या काठमांडू येथे झाली. भारतासह सर्व दक्षिण आशियातील देश अफगाणिस्तान, बांगलादेश, भुतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या राष्ट्रीय व विभागीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थांकडून माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला. जगभरातील हवामान स्थिती, विविध हवामान मॉडेलचा विचार करून हा अंदाज तयार करण्यात आला आहे.

प्रशांत महासागरात सध्या सौम्य एल-निनो स्थिती आहे. मॉन्सून शेवटच्या टप्प्यात ही स्थिती कमजोर होईल, यावर सर्वच सहभागी शास्त्रज्ञांचे एकमत झाले. ऑक्‍टोबरपासून विषुवृत्तीय प्रशांत महासागरात समुद्राच्या भुपृष्ठाचे तापमान सरासरीपेक्षा वाढले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या सुरवातीच्या काळात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान खूपच वाढले होते. सॅस्कॉफमार्फत पावसाच्या अंदाजाविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नकाशानुसार महाराष्ट्रातील कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्‍यता 40 टक्‍के आहे. तर उर्वरित राज्यात सरासरी इतक्‍या पावसाची शक्‍यता 60 टक्‍के आहे. कोकण, गोव्यासह कर्नाटक किनारपट्टी, उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगालच्या काही भाग, ईशान्य भारताचा सीमावर्ती भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्‍यता 40 ते 60 टक्‍के आहे. तर ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्‍यता 50 ते 70 टक्‍के आहे, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित भारतात सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्‍यता अधिक (50 ते 70 टक्‍के) असल्याचे स्पष्ट होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.