मुंबई – पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यानंतर राज्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. विस्ताराच्या पाश्वभूमिवर आज मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठकांमागून बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये संभाव्य मंत्रिमंडळातील चेहरे तसेच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही निश्चित झाली असून 14 जून रोजी शपथविधी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा राज्यापासून दिल्लीपर्यंत रंगल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होणारच असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितल्यानंतर आज मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठकांमागून बैठका पार पडल्या. कॉंग्रेसचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, कॉंग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, वडाळ्याचे आमदार कालीदास कोळंबकर, विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मंत्रायात चर्चा केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते.
या चर्चेनंतर संभाव्य विस्तारात कोणाकोणाची वर्णी लागणार याची चर्चा मंत्रालचात सुरू झाली आहे. 12 व 13 जून रोजी भाजपच्या कोअर कमिटीची पुन्हा एकदा दिल्लीत बैठक आहे. या बैठकीत नावे अंतिम झाल्यानंतर 14 जून रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.
नवीन मंत्रिमंडळ विस्तारात दोन कॅबिनेट मंत्रिपदे तर पाच राज्यमंत्री पदे दिली जाणार आहेत. राज्यमंत्र्यांमध्ये मराठवाड्यातील आमदार अतुल सावे, सांगलीचे शिवाजीराव नाईक, बुलढाण्याचे संजय कुटे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या नावाचीही चर्चा आहे. विजयसिंह मोहिते भाजपामध्ये आल्यास त्यांना राज्यपाल बनवले जाऊ शकते किंवा त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होऊ शकेल, असे बोलले जात आहे.