नवी दिल्ली – देशात करोनाची तिसरी लाट येणार आहे हे वास्तव आहे. त्यामुळे आम्ही आता या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याचे काम युद्धस्तरावर हातात घेतले आहे अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज येथे बोलताना दिली.
ते म्हणाले की, ब्रिटनमधून या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. तेथे करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. तेथे करोना लसीकरणाचे काम 45 टक्के पूर्ण झाले असतानाही ब्रिटनमध्ये करोना रुग्ण वाढीला लागणे हे तिसऱ्या लाटेचेच संकेत मानावे लागतील. त्यामुळे आता आपल्याला निवांत बसून चालणार नाही. केजरीवाल यांच्या हस्ते आज दिल्लीतल्या नऊ रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या 22 प्लांटचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, या प्लांटमुळे आमची करोना विरोधातील लढाई आणखी सोपी होणार आहे. ते म्हणाले की, तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी आम्ही अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. ज्या प्रमाणे दुसऱ्या लाटेचा आपण एकजुटीने सामना केला तशीच एकजूट आपल्याला या संभाव्य लाटेसाठीही करावी लागणार आहे असे ते म्हणाले.